Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari: आम्ही संघर्ष करत नाही, त्यांनाच खाजवायची सवय पडलीय; राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल
विद्यापीठ कायद्यावरून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी विद्यापाठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली: विद्यापीठ कायद्यावरून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी विद्यापाठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर हल्ला चढवला आहे. राज्यपालांवर टीका करताना राऊतांची जीभही घसरली. आम्ही संघर्ष करत नाही. त्यांना खाजवायची सवय पडलीय. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढीपण खाज बरी नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपालांवर हल्ला चढवला आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी हा हल्ला चढवला. तसेच महामंडळाच्या नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) घटकपक्षांनाही टोले लगावले. महामंडळाच्या नियुक्त्या का रखडल्या? कुणामुळे रखडल्या? यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार, आमदार संसदीय कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीत आले आहेत. त्याबाबतही राऊत यांनी भाष्य केलं. शिक्षणासाठी किंवा काही गोष्टी शिकण्यासाठी खासदार आणि आमदार दिल्लीत येतात. राज्यातील सर्व पक्षांचे हे खासदार आहेत. आमचं कर्तव्य आहे त्यांच्याशी बोलावं. संवाद साधावा. पक्ष वगैरे महाराष्ट्रात. दिल्लीत आम्ही सर्व एकत्र आहोत. हे सर्व आमदार, खासदार संध्याकाळी येत आहेत सफदरजंग लेनला. निलम गोऱ्हे आणि 80 आमदार, अधिकारी आहेत. त्यानंतर संध्याकाळी रात्री शरद पवारांकडे त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था आहे. डिनर डिप्लोमसी नाही. जेवण आहे. आम्ही यजमान आहोत त्या सर्वांचे. असं वातावरण खेळीमेळीचं महाराष्ट्राच्या राजकारणात होतं आणि ते राहावं असं आम्हाला वाटतं. विशेषत दिल्लीत आम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्रं असायला हवं, असं राऊत म्हणाले.
आम्ही जातीय, धार्मिक फाळणीच्या विरोधातील
भाजपच्या खासदार आणि आमदारांनाही भोजनाचं आमंत्रण दिलं का? असा सवाल केला असता आमंत्रण सर्व पक्षांना दिलं आहे. आमच्यात फाळणी होत नाही. आम्ही राजकीय जातीय धार्मिक फाळणीच्या विरोधातील आहोत. अखंड महाराष्ट्रातील जे जे खासदार दिल्लीत उपस्थित आहेत. त्यांना बोलावलं आहे. यात राजकीय पक्ष पाहण्याची आवड कुणाला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे सर्व खासदारांची बैठक घेणार
काल शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्याबाबतची माहिती राऊतांनी दिली. काही खासदारांनी काही भूमिका मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेने शिवसंवादाच्या निमित्ताने खासदार विदर्भात गेले होते. त्यांनी अहवाल तयार केला आहे. संसदेचं अधिवशेन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सर्व खासदारांची बैठक होईल. या दौऱ्यात जो अनुभव आला त्यावर आणि संघटनात्मक त्रुटीवर चर्चा केली जाईल. खासदारांच्या काही तक्रारी आहेत असं तुम्ही म्हणता त्यात तथ्य नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावं लागेल हे मात्र खरं आहे. शिवसेनेच्या मंत्र्याबाबत बोलता येणार नाही. आघाडी म्हणून प्रत्येक मंत्र्याचं कर्तव्य आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाचं ऐकलं पाहिजे. त्याला मदत केली पाहिजे. इतर पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो दुसऱ्या पक्षाकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टी कॉमन आहेत. सरकार तीन पक्षाचं आहे. त्याबाबत काही सूचना दिल्या पाहिजे, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : नवी दिल्ली शिवसेना खासदारांच्या बैठकीत नाराजी