सर्वात मोठी बातमी ! तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊत यांचा राहुल गांधी यांना थेट इशारा
सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची मागणी आहे. भाजपमधील आणि इतर नवीन सावरकर भक्त आमची मागणी का उचलून धरत नाही? नकली हिंदुत्ववाद्यांना सवाल आहे.
मुंबई: महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देतानाच सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर त्यांची रॅली सुरू आहे. असं सुरू असताना हा विषय काढण्याची गरज नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.
सावरकरांचा विषय काढल्याने शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला. राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्र आणि देशातील लोकांना सावरकरांबद्दल आदर. इतिहासात काय घडलं आणि काय नाही हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा. त्या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.
वीर सावरकारांच्या मुद्दयावर काल उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं आहे. सावरकरांची बदनामी, त्यांच्याविषयीचं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची मागणी आहे. भाजपमधील आणि इतर नवीन सावरकर भक्त आमची मागणी का उचलून धरत नाही? नकली हिंदुत्ववाद्यांना सवाल आहे. तुम्ही सावरकरांना भारतरत्न द्या. केवळ नकली आणि ढोंगी प्रेम दाखवू नका, असा टोला त्यांनी लगावला.
सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. सावरकर हे त्यांचे आदर्श पुरुष कधीच नव्हते. आता राजकारणासाठी त्यांनी सावरकरांचा विषय घेतला आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. तो आजचा नाही, असंही ते म्हणाले.