‘त्या’ नेत्याची शिंदे गटात कुंचबना, कधी परत फिरू शकतात; सुषमा अंधारे मतावर ठाम
मी नाराज नाही. मी कुठेही जाणार नाही. माझी काळजी केल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या दाव्यातील हवा काढून टाकली.
जळगाव: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) ठाकरे गटाच्या संपर्कात असून ते ठाकरे गटात (thackeray camp) प्रवेश करणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, अंधारे यांचा हा दावा स्वत: संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे. मी कुणाच्याही संपर्कात नाही. मी शिंदे गटातच आहे, असं शिरसाट म्हणाले. मात्र, शिरसाट यांच्या या विधानानंतरही सुषमा अंधारे या आपल्या मतावर ठाम आहेत. शिरसाट कधीही परत फिरू शकतात, असा दावा सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. आमदार संजय शिरसाट हे सर्वात आधी शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. पण त्यांना सत्तेत येतात बाजूला सारलं गेलं.
त्यांच्यापेक्षा औरंगाबादेत अतुल सावे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना फुलफ्लेज अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे शिरसाट यांची शिंदे गटात कुचंबना होत आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
शिरसाट आपल्या संपर्कात आहेत. आपल्या दाव्याचे गांभीर्य दीपक केसरकर यांना कळत नाही. शिरसाट यांच्यावर जो अन्याय झाला आहे. त्यामुळे ते कधीही परत फिरू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.
कधी कधी माणसं बेईमान होतात. मात्र आमच्याकडून परतीचे दोर कापल्या गेले नाहीत. या घडीला सर्वात प्रथम शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे आमदार ठरतील. संजय शिरसाठ यांची ना मंत्रिपदावर, ना कार्यकारणीत वर्णिली लागली.
औरंगाबादमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार व संदीपान भुमरे यांना मंत्रिपद देवून संजय शिरसाट यांच्या मंत्रीपदाची आशा मावळली आहे. शिंदे गटात जाऊन सर्वात जास्त पश्चाताप हा संजय शिरसाठ यांना झाला आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मी नाराज नाही. मी कुठेही जाणार नाही. माझी काळजी केल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या दाव्यातील हवा काढून टाकली. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असणं स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असं नाही की लगेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं, असंही ते म्हणाले.