सरकारच्या दोन आमदारांचा राडा, एकाचा सरकारलाच निर्वाणीचा इशारा; शंभुराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स काल बारामतीत लागले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. 2024 चा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार ही राष्ट्रवादीची भूमिका असु शकते.
सातारा: भाजपचे समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) आणि शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. राणा यांनी केलेल्या खोक्यांच्या आरोपावरून बच्चू कडू चांगलेच संतापले असून त्यांनी राणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या गटातील आमदार कमी होणार नाहीत. उलट आमच्या आमदारांची संख्या वाढेल, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना या आमच्या गटातील आमचे 50 आमदारांची संख्या अजून वाढेल. पण ही संख्या कमी होणार नाही. आम्ही सर्व शिंदे साहेबांच्या सोबत आहोत. जे काही अंतर्गत मतभेद असतील ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून सोडवतील, असं शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी बोलण्यास नकार दिला. आदित्य ठाकरे यांच्या टीकेकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. देवेंद्र फडणवीसांच म्हणणं योग्यच आहे. नाहक टीका करणाऱ्यांवर जास्त वेळ घालवू शकत नाही. अशा नाहक टीकेला आम्ही महत्त्व देत नाही, असंही ते म्हणाले.
अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स काल बारामतीत लागले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. 2024 चा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार ही राष्ट्रवादीची भूमिका असु शकते. मात्र 100 दिवसात आम्ही 700 जीआर काढले. शेतकऱ्यांना आम्ही भरघोस मदत केलीये. त्यामुळे राष्ट्रवादीला आणि अजित पवार यांना त्यांची स्वप्न बघुद्यात. 2024चा मुख्यमंत्री हा भाजपा आणि शिंदे गटाचाच असेल, असंही त्यांनी सांगितलं.