मोठी बातमी ! वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी; दैनिक ‘सामना’तून थेट पवार यांनाच घरचा आहेर
दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून पहिल्यांदाच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या उणीवा दाखवण्यात आल्या आहेत. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख आणि पक्षातील नेते तसेच कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा घरचा आहेर ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. दैनिक सामनातून थेट पवार यांच्यावरच निशाणा साधल्याने खळबळ उडाली आहे.
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार हे समीकरण आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. पवार यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाहीत. त्यात शरद पवार अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
राष्ट्रवादी हादरली
शरद पवार यांनी वारस निर्माण न केल्यानेच त्यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेस बुंध्यापासून हादरली. आता आपले कसे होणार? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे निर्माण झाला. त्यामुळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे पवारांना राजीनामा मागे घ्यावा लागला, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज
भाजपने पवारांच्या राजीनाम्यावर नौटंकी असं म्हटलं आहे. भाजप हा एक पोटदुख्या पक्ष आहे. त्यांना दुसऱ्यांचं चांगलं व्हावं किंवा घडावं असं कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष मोडून उभा राहिलेला हा पक्ष आहे. राष्ट्रवादीला नौटंकीबाज म्हणण्यापूर्वी भाजपने सर्वात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहावे, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.
प्लान कचऱ्यात गेला
शिवसेना फोडल्यानंतर भाजपला राष्ट्रवादी फोडायचा होता. त्यांचा प्लान तयार होता. लोक बॅगा भरून तयार होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्थाही पूर्ण झाली होती. मात्र शरद पवार यांच्या खेळीने भाजपचा प्लान कचऱ्यात गेला. शरद पवार आल्याने भाजप लॉजिंग बोर्डिंग रिकामेच राहिले, अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे.