Koregaon Bhima Case: कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.
मुंबई : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pwar on Koregaon Bhima) यांची साक्ष आज नोंदवली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार यांची साक्ष आज मुंबईत नोंदवली जाईल. कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Case) प्रकरणी याआधीही शरद पवारांना साक्ष (Statement) नोंदवण्यासाठी समन्स देण्यात आलेलं होतं. आज शरद पवार साक्ष नोंदवायला जाण्याआधी त्यांना देण्यात आलेलं समन्स हे आतापर्यंतचं तिसरं समन्स होतं. याआधी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्याची शक्यता होती. मात्र काही परिहार्य कारणास्तव समोर हजर राहू शकले नव्हते. दरम्यान, आज शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असून त्यासाठी ते सकाळी मुंबईच्या सिल्वर ओक बंगल्यावरुन रवानाही झाले.
काय आहे नेमके प्रकरण?
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान पोलिसांनी एकूण 162 जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळं भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
पाहा व्हिडीओ :
आतापर्यंत या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग नेमला आहे. या चौकशी आयोगाकडून साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार यांना समन्स पाठवण्यात आला आहे.
पवारांची साक्ष कशासाठी?
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळेच भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळल्याचा आरोप त्यावेळी शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर पवार यांची देखील साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी वकील प्रदीप गावडे यांनी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.