Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या निकालाने धक्का बसला नाही, शरद पवार यांची निकालावर पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मला स्वत:ला धक्का बसेल असा मोठा निकाल नाही. मतांची संख्या बघितली तर प्रत्येक उमेदवाराची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा जो कोटा होता, त्यात काही फरक पडलेला नाही.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यसभेच्या निकालाने मला स्वत:ला धक्का बसला नाही. आमच्याकडे पुरेसा कोटा होता. त्यानुसार प्रत्येक उमदेवाराला मते मिळाली आहेत. सहाव्या जागेसाठी मोठा गॅप होता. आमच्याकडे मतांची संख्या कमी होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते. तरीही सहाव्या उमेदवारांने चांगली मते घेतली, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच या निवडणुकीत अपक्षांची मते फुटली आहेत. आघाडीच्या एकाही आमदाराचं मत फुटलं नाही. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार स्थिर आहे, असा निर्वाळाही पवारांनी दिला.
राज्यसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मला स्वत:ला धक्का बसेल असा मोठा निकाल नाही. मतांची संख्या बघितली तर प्रत्येक उमेदवाराची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा जो कोटा होता, त्यात काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना ज्यादा पडलं. ते कुठून आलं ते मला ठावूक आहे. ते या आघाडीचं नाही. दुसऱ्या बाजूचं आहे, असा दावा शरद पवार यांनी केला.
फडणवीसांना यश आलं
सहावी सीट शिवसेनेने लढवली. तिथे आमची गॅप फार होती. मतांची संख्या कमी होती. पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या भाजपकडे अधिक होती. आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी इतकी मते नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे आमदार होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला. नाही तर आघाडीच्या संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालं आहे. त्यात वेगळं काही नाही. एकंदर जो चमत्कार झाला आहे. विविध मार्गाने माणसं आपल्या बाजूने करण्यात फडणवीसांना यश आलं हे मला मान्य केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
आघाडीला धोका नाही
या निकालामुळे सरकारवर काही परिणाम होणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या निकालाने सरकारवर काही परिणाम झालेला नाही. तुम्ही कॅलक्यूलेशन पाहा. सरकारला बहुमतासाठीचा आकडा आहे. त्यात काही फरक पडलेला नाही. सरकारला धक्का बसलेला नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.