शिंदे गटाचे 50 आमदार लवकरच गुवाहाटी आणि अयोध्येला जाणार; कारण काय?
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. त्यावरूनही त्यांनी टीका केली. हेच काम अडिच वर्षांपूर्वी केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांपर्यंत आपण गेलं पाहिजे.
पुणे: शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 50 आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीबरोबरच हे आमदार अयोध्येलाही जाणार आहेत. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे शिंदे गट लवकरच अयोध्या आणि गुवाहाटीला जातील. मात्र, हा दौरा कधी असेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यानंतर हा दौरा होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आम्ही लवकरच अयोध्या आणि गुवाहाटीला जाणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्ही अयोध्येला जायला निघालो होतो. आमचे बोर्डिंग पास तयार होते. पण आम्हाला विमानतळावरून परत पाठवलं होतं. तो आमचा दौरा अर्धवट राहिला आहे. म्हणूनच आम्ही आता अयोध्येला जाणार आहोत, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.
अयोध्येला गेल्यावर आम्ही श्रीरामाचं दर्शन घेणार आहोत. तसेच गुवाहाटीला जाऊन आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्याला आम्ही नंबर एकवर पोहोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. इतरही लोक संपर्कात आहेत. ते आमच्यासोबत येतीलच. येणाऱ्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
ठाकरे गटातील काही आमदारांशी आमची बोलणी सुरू आहे. त्यामुळे तेही आमच्या गटात येतील. त्यानंतर शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. त्यावरूनही त्यांनी टीका केली. हेच काम अडिच वर्षांपूर्वी केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांपर्यंत आपण गेलं पाहिजे. लोकांच्या दारात आपण गेलं पाहिजे हे आम्ही अडिच वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना सांगत होतो. आम्ही जात होतोच. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनीही जावं असं आमचं म्हणणं होतं. पण त्यांना वर्षा आणि मातोश्री निवास सोडवत नव्हतं, अशी टीकाही त्यांनी केली.