5 जुने, 8 नवे चेहरे, ‘त्या’ नावाचाही समावेश; शिंदे गटाकडून कुणा कुणाचं मंत्रिपद फिक्स; यादी आली…
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाच्या 5 जुन्या आणि 8 नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. प्रादेशिक समतोल आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई आदी जुन्या चेहरे तर संजय शिरसाट, भरत गोगावले, आदी नवीन चेहरे या यादीत आहेत.
अवघ्या काही तासात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी मंत्र्यांना फोन गेले आहेत. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने आजच इच्छुकांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. भाजप आणि अजितदादा गटाकडून आमदारांना मंत्रिपदासाठीचे फोन गेले आहेत. तर शिंदे गटानेही तब्बल 12 जणांना फोन करून मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिंदे गटाकडून यावेळी 5 जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 8 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक समतोल, जातीय समीकरण आणि पक्षाची गरज या तीन गोष्टी पाहून शिंदे गटाकडून मंत्रिपदाची वाटणी केल्याचं सांगितलं जात आहे.
या जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी
एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये पाच जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे यांच्या नावाचा समावेश आहे. या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन केला गेल्याचं सांगितलं जात आहे. तसेच संजय राठोड यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्यांना अजून कोणताही फोन गेला नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
या नव्या चेहऱ्यांना संधी
शिंदे यांनी यावेळी आठ नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल, विजय शिवतारे आणि योगेश कदम या आठ नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या नेत्यांना फोनही गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे गेल्या टर्मपासूनच मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मंत्रिपदाच्या चर्चेत हे दोन्ही नेते सातत्याने चर्चेत होते. आताही या दोन्ही नेत्यांनी उघडपणे मंत्रिपदाची आपली इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे या नेत्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबईत एकही मंत्रिपद नाही?
शिंदे गटाच्या 12 संभाव्य मंत्र्यांची यादी पाहिली तर यात मुंबईला प्रतिनिधीत्व दिलं गेलं नसल्याचं दिसत आहे. मुंबईतून एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं या यादीतून दिसतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शिंदे यांनी मुंबईत मंत्रिपद न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून प्रताप सरनाईक यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एकही लाडकी बहीण नाही?
शिंदे गटाच्या यादीत एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्याचं दिसतं. शिंदे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणल्याचा गाजावाजा केला होता. महिलांनीही शिंदे गटासह महायुतीला भरभरून मतदान केलं. पण शिंदे गटाची यादी पाहता यात एकाही महिलेचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.