Sanjay Raut : भाजपला चेकमेट देण्यासाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये?, महाराष्ट्राबाहेरही झंझावाती दौरा करणार; राऊतांनी केली मोठी घोषणा
Sanjay Raut : फुटीरतावाद्यांनी शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केल्याचं वृत्त तुमच्या माध्यमातून ऐकलं आहे. हा सर्व प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस-2 आहे. कॉमेडी एक्सप्रेस सीजन-1 विधीमंडळात झाला. 20 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. खंडपीठात फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागेल.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचं बंड आणि शिवसेना खासदारही बंडाच्या तयारी असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यातही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) झंझावाती दौरे करणार आहेत. तशी घोषणाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. आम्ही हा संपूर्ण प्रकार अजूनही फार सौम्यपणे घेत आहोत. कायदेशीर लढाईतच आमचा वेळ जातोय. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील. महाराष्ट्राबाहेरील राज्यांचा दौरा करतील. त्यानंतर एक तुफान निर्माण होईल, त्या तुफानापुढे कोणीही टिकणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरही दौरे करणार असल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामागे केवळ शिवसेना मजबूत करणं हेच प्रमुख कारण नाही तर भाजपला इतर राज्यात चेकमेट देणं हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. फुटीरतावाद्यांनी शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केल्याचं वृत्त तुमच्या माध्यमातून ऐकलं आहे. हा सर्व प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस-2 आहे. कॉमेडी एक्सप्रेस सीजन-1 विधीमंडळात झाला. 20 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. खंडपीठात फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागेल. आम्हाला खात्री आहे. जी याचिका शिवसेनेची आहे. ती याचिका कायद्याच्या आधारे पक्की आहे. आम्हाला न्याय मिळेल म्हणून त्या भीतीतून सर्व उपदव्याप सुरू आहेत. एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कसा काय बरखास्त करू शकतो, असा सवाल राऊत यांनी केला.
हा लोकांना भ्रमित करण्याचा प्रकार
त्या गटाला मान्यता नाही. पक्षही त्यांचा नाही. हे लोक बाळासाहेबांचा पक्षाची कार्यकारीणीच बरखास्त करत आहे. कातडी वाचवण्यासाठी, फुटून गेलेले आमदार पळून जाऊ नये म्हणून धडपड सुरू आहे. शिवसेनेचे नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने तयार केले आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. हा गट नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. कायद्यानेही नाही. लोकांना भ्रमित करण्याचाहा प्रकार आहे. त्याचा सेनेवर परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
तर खासदारांवर कारवाई करू
लोकसभेत कुणी वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. शिवसेनेचे खासदार फुटीर गटाबरोबर बैठका घेत असेल तर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणताही आधार नाही. एक फुटीर गट मूळ पक्षाची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो? त्यांना अधिकारच नाही, असा दावाही त्यांनी केला.