भाजप सेनेतील युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात, दिल्लीत मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण
महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. हे सरकार पडणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी आणि अमित शहांनी पुढाकार घेतला तर राज्यात परिवर्तन घडू शकते, असं मोठं विधान शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं.
नवी दिल्लीः देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असं मोठं वक्तव्य शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं. नवी दिल्लीत आज त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र येण्यासंदर्भातलं हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यात हे सरकार फार काळ टिकणार नाही, अडीच वर्षे होताच भाजप-शिवसेना पुन्हा जवळ येतील अशी चर्चा असतानाच अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी झी 24 तास या वाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले,राज्यात कोणतंही परिवर्तन घडवायचं असेल त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत आमचे जुने संबंध आहेत. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. मग ते विरोधक का असेनात. गडकरी हे राजकारणातील विद्यापीठ आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचेही जुने संबंध आहेत. मात्र राज्यातील भाजप नेत्यांच्या राजकारणामुळे गडकरी राजकारणात लक्ष देत नाहीत. भाजप आणि युतीचा पूल बांधायचा असेल तर ते फक्त गडकरीच करू शकतात. परंतु युतीचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्यही अब्दुल सत्तार यांनी केलंय.
जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम वेगाने
अब्दुल सत्तार यांनी नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी केली. या रस्त्याची 200 कोटी रुपयांची कामे बाकी होती. हा निधी गडकरी यांनी तातडीने मंजूर केल्याची माहिती अब्दुल सत्तार यांवनी दिली.
इतर बातम्या-