Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या नादाला लागल्यास राजकीय जीवनाची राखरांगोळी, भास्कर जाधवांचा इशारा
Bhaskar Jadhav : शिवसेना अंगार आहे आगीशी कोणी खेळणार असेल तर खेळणाऱ्याची राजकीय कारकीर्द जळून खाक होईल. संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे. 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खाद्यावर विश्वासाने ठेवली होती.
रत्नागिरी: शिवसेनेच्या (shivsena) नेतेपदी निवड होताच भास्कर जाधव यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं, असं शल्य भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केलं आहे. संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी, असं मतही जाधव यांनी व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत टीका केली होती. त्यालाही जाधव यांनी प्रयत्युत्तर दिलं. आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. मात्र, शिवसेना एकासोबत कायम राहिली. त्यांच्या सारखा आम्ही मित्र पक्षांना दगा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 56 दसरा मेळावा घेण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला, एक चिन्ह एक झेंडा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे. कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल. शिवसेनेच्या नादाला लागू नका, असा दमच त्यांनी विरोधकांना भरला.
आमच्या युतीचा भाजपला धसका
शिवसेना अंगार आहे आगीशी कोणी खेळणार असेल तर खेळणाऱ्याची राजकीय कारकीर्द जळून खाक होईल. संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे. 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खाद्यावर विश्वासाने ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं, अशी टीका त्यांनी भाजपचं नाव न घेता केली. शिवसेनेशी युती असताना मात्र या पक्षाने अनेक पक्षाची युती केली आणि मित्र पक्षांना संपवले, असंही ते म्हणाले.
जाधव यांची नेतेपदी निवड
दरम्यान, भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. जाधव यांची नेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती मिळताच अनेक कार्यकर्ते त्यांना त्यांच्या कार्यालयात येऊन भेटत आहेत. त्यांचं अभिनंदन करतानाच सत्कारही करत आहेत. फैसल कासकर या निष्ठावंत कार्यकर्त्याने भास्करराव जाधव यांना मीठीच मारली. त्यामुळे भास्कर जाधव भावूक झाले होते.