सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा नेते नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. दरम्यान यावरून आता शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये थेट लढत रंगल्याचे पहायाला मिळाले. नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने आल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र या निवडणुकीत नारायण राणे यांनी बाजी मारली. आता यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले केसरकर?
जिल्हा मध्यवर्ती बँकेत जरी नारायण राणे यांचा विजय झाला असला तरी, उमेदवारांचे एकूण मतदान बघितले तर त्यात भाजपा पिछाडीवर असल्याचे दिसून येते. यावरून जिल्ह्यातील मतदान नारायण राणे यांच्या बाजूने नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका केसरकर यांनी केली आहे. केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, या निवडणुकांमध्ये सहा उमेदवार असे असतात की ज्यांना सर्व सभासद मतदान करत असतात. हे मतदान जिल्ह्यातील जनता कुणाच्या बाजुने असते याचे रिफ्लेक्शन असते.
पैसे वाटप केल्याचा अप्रत्यक्ष आरोप
नारायण राणे हरत असल्याचे जेव्हा भाजपाच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याठीकाणी रविंद्र चव्हाण यांना पाठवले. रविंद्र चव्हाण यांनी कशाची जादू केली हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आतापर्यंत माझा लढा हा दहशतवाद्यांविरोधात होता. आता निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप करणाऱ्यांविरोधात असेल, असे म्हणत केसरकर यांनी या निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील केला आहे.
राणे विरुद्ध शिवसेना थेट लढत
ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी ती राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशीच होती. जिल्हा बँकेत भाजपला हरवणं म्हणजे राणेंच्या वर्चस्वला धक्का लावणं असं समीकरण होतं. त्यामुळे शिवसेना त्वेषाने या निवडणुकीत उतरली होती. पण तरीही राणेंनी 11 जागा जिंकत बँकेवर आपलंच वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं. तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकून मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं आहे. मात्र आता या निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे.
संबंधित बातम्या
मोदीजी 700 शेतकरी तुमच्यामुळेच मेले, मोदी अहंकारी आणि हुकूमशहा-नाना पटोले
समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढाई थांबणार नाही: नवाब मलिकॉ
VIDEO: मोदींना भेटलो तेव्हा मला ते अहंकारी वाटले; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा घरचा आहेर