सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या महाराष्ट्र, दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट
सुमित कुमार नरवरच्या नावाचा मागे मी उल्लेख केला होता. बुलंद शहरातील या दूध विकणाऱ्या सामान्य माणसाची प्रॉपर्टी चार पाच वर्षात आठ हजार कोटी झाली आहे. आता मलबार हिलमध्ये तो राहतो.
मुंबई: सुमित कुमार नरवरच्या (sumit kumar narvar) नावाचा मागे मी उल्लेख केला होता. बुलंद शहरातील या दूध विकणाऱ्या सामान्य माणसाची प्रॉपर्टी चार पाच वर्षात आठ हजार कोटी झाली आहे. आता मलबार हिलमध्ये तो राहतो. पूर्वी तो नोएडात राहत होता. त्याला राहायला घरही नव्हतं. ईडीने (ed) कोणता चष्मा लावला आहे. जरा आमच्याकडेही त्या चष्म्यातून पाहा. मी त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. दिल्ली महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा पैसा त्याच्याकडे आहे ही माहिती देईल, असं सांगतानाच त्याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. पैसा कुणाचा आहे, ट्रायडन्ट कुणाचा आहे? पाच वर्षापूर्वी त्यांना कामं मिळत होती. माझ्याकडे सर्व माहिती आहे. ही भानामती सांगणार. त्यानंतर तुम्ही आमच्यावर रेडही टाकाल. आम्हाला अटक कराल. करा, असं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज दिलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच ट्विट करून उद्या सेनाभवनमध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच आज सकाळीही त्यांनी मीडियाशी संवाद साधून तपास यंत्रणाच भ्रष्टाचारी असल्याचं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान कार्यालयाला तपास यंत्रणांच्या भ्रष्टाचाराबाबत दिलेलं पत्रंही पत्रकार परिषदेत देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राऊत यांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. गेल्यावेळी राऊत यांच्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेनेने मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. आज त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
आता वॉर्डांमध्येही धाडी पडतील
मुंबईत आज बऱ्याच घडामोडी घडत आहेत. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यामुळे तुम्हालाही खूप काम आहे. इथून तिथे तिथून इथे. आम्ही ठरवलं आपणही रेड टाकावी. आम्हाला घुसायचा अधिकार आहे. आमच्या घरात कुणी घुसत असेल तर मुंबईत शिवसेनेलाही घुसायचा आणि घुसवायचा अधिकार आहे. मी सकाळापासून पाहत आहे. आज काही कार्यकर्त्यांवर आयकरच्या धाडी पडत आहेत. काही भानामती सुरू आहेत. आता आयटीच्या भानामती सुरू आहे. जोपर्यंत बीएमसीच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत प्रत्येक वॉर्डात धाडी पडतील. आता जिथे जिथे सेनेचे कार्यकर्ते आहेत, निवडणूक लढत आहेत, शाखा आहेत तिथे धाडी टाकाव्यात, एवढंच काम ईडीला राहिलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
शिवसेना, तृणमूलवरच कारवाई का?
केवळ महाराष्ट्र आणि बंगालमध्येच सिलेक्ट लोकांनाच टार्गेट का केलं जात आहे हा सवाल आहे. या देशात इतर राज्यात कोणी मिळत नाही का? केवळ शिवसेना आणि तृणमूलच मिळत आहे का? हे सरकार पाडण्याचं षडयंत्र आहे. शिवसेनेच्या आघाडीच्या सरकारला दबावात आणून त्यांना अस्थिर करण्याचं हे मोठं षडयंत्रं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ही भानामती काय आहे?
आयकर आणि ईडीला मी पुराव्यासह 50 नावं पाठवली आहेत. मी वारंवार उल्लेखही केला आहे. पण ईडी आणि आयकरला एक जबाबदार खासदार काही बोलत असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे असं त्यांना वाटत नाही. आमच्याबाबतीत हे बोगस ते बोगस असं म्हटलं. किरीट सोमय्याने एका केंद्रीय मंत्र्यांबाबत बोगस कंपन्यांची लिस्ट दिली काहीच झालं नाही. कोणी ढवंगाळे यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी स्वत: पाठवली. काय झालं त्याच? संपूर्ण देशात सर्वाधिक ईडीची चौकशी, कारवाई केवळ महाराष्ट्रात झाली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमधील 7 लोकांवर कारवाई झाली आहे. भाजपच्या नेत्यांवर कोणतीही कारवाई नाही. ते काय हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे का. ही भानामाती काय आहे त्याचा शिवसेना लवकरच खुलासा कणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut Press Conference LIVE : आज राऊतांचं टार्गेट काय? शिवसेना भवनावरून दुसरी पत्रकार परिषद
भाजप नेते, ईडीच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे फाडणार, पत्रकार परिषदेआधी राऊतांची पुन्हा डरकाळी