Shiv Sena: शिवसेना खासदारांचा संसदेतही नवा गट?, राहुल शेवाळे नवे गटनेते होणार?
Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. त्यापैकी चार खासदार तर शिवसेनेच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नव्हते.
मुंबई: एकदा संकट आल्यानंतर संकटाची मालिकाच सुरू होते, असं म्हटलं जातं. शिवसेनेच्या (shivsena) बाबतीत हे तंतोतंत खरं ठरताना दिसत आहे. आधी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड करून 40 आमदारांना वेगळं केलं. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. आता शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून आपला नवा गट स्थापन करणार आहेत. तसेच या नव्या गटाचे संसदेतील नेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्याच्या शिवसेनेच्या या 14 खासदारांच्या हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या सांगण्यावरून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही खासदार वेगळी वाट धरण्याच्या मार्गावर असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. त्यापैकी चार खासदार तर शिवसेनेच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नव्हते. त्यातच खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रं देऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची जाहीर मागणी केली. त्यानंतर शिवसेनेच्या इतर खासदारांनीही उद्धव ठाकरेंवर भाजपच्या खासदाराला पाठिंबा देण्यासाठी मोठा दबाव वाढवला होता. त्यामुळे संपुआचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिलेला असतानाही उद्धव ठाकरे यांना खासदारांच्या दबावापोटी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला होता. त्यानंतरही शिवसेनेच्या खासदारांचं समाधान झालं नाही. त्यामुळे हे खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून संसदेत आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा गट भाजपला पाठिंबा देणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
मोदींना भेटणार?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीत जात आहेत. उद्या शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. यावेळी शिवसेनेचे 14 खासदारही त्यांच्यासोबत असणार आहेत. या भेटीत मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, संसदेत वेगळा गट स्थापन केल्यावर हे खासदार मोदींना भेटणार की त्या आधी भेटणार याची माहिती मिळू शकली नाही.