Shiv Sena : असली शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगाची नोटीस येताच शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव, एवढी घाई कशाला; चतुर्वेदींचा सवाल
Shiv Sena : प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबतची माहिती दिली. आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस दिली. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे? निवडणूक आयोगाला एवढी घाई का?
नवी दिल्ली: शिवसेनेच्या मागे लागलेलं संकट अजून काही कमी होताना दिसत नाही. शिवसेनेतून आमदार आणि खासदार फुटल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्रं दिलं आहे. तसेच आपलीच शिवसेना (shivsena) ओरिजीनल असून आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं द्यावं, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगानेही शिवसेनेला नोटीस बजावल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाला एवढी कशाची घाई लागली आहे, असा सवाल शिवसेनेच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी केला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबतची माहिती दिली. आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस दिली. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे? निवडणूक आयोगाला एवढी घाई का? निवडणूक आयोगाने जी नोटीस पाठवलीये त्याविरोधात आम्ही कोर्टात याचीका दाखल केली आहे. प्रकरण प्रलंबित असताना नोटीस का?, असा सवाल या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली लागेपर्यंत निवडणूक आयोगाने या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही करू नये. तसे आदेशच निवडणूक आयोगाला देण्यात यावेत, अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं चतुर्वेदी यांनी सांगितलं.
कदाचित मोदींना काम बघायचं असेल
आदित्य ठाकरे यांनी काम केलेल्या पर्यावरण खात्याचं केंद्र सरकारने ऑडिट सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून चांगल काम केलंय. ते मोदींना बघायचं असेल म्हणून ऑडीट करायचं ठरवलं आहे. करू द्या चांगल काम पाहायला मिळेल, असा टोला त्यांनी लगावला.
मग तीन तीन मंत्रिपदे कशाला घेतली?
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडीच वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे आठवले. मग तीन तीन मंत्रीपद कशाला घेतली?, असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आता काहीही बोलतात. पण देवाला माहिती आहे. हे असे मुख्यमंत्री आहेत की जे मुख्यमंत्री होऊनही उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं, असा टोला त्यांनी लगावला.
सत्तार मैदानात या आणि लढून दाखवाच
आता जे सरकार आलंय तेही घटनाबाह्य आहे. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र म्हटलं जातं होतं. आता कुठे नेऊन बसवलं? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचं आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जायचं ठरलं होतं या फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका केली. तसेच अब्दुल सत्तार मैदानात या शिवसेना पक्ष आणि चिन्ह सोडून निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.