शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली; शरद पवारांपुढे लीन झालेय: प्रविण दरेकर
राज्य सरकारने स्वत:च्या काळजात काय चाललंय यापेक्षा शेतकरी आणि जनतेच्या मनातील गोष्टी जाणून घ्याव्यात. | Pravin Darekar
वसई: सध्याच्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा विसर पडला आहे. संपूर्ण पक्ष हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापुढे लीन झाल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. शिवसेना स्वत:चा इतिहास विसरत चालली आहे. त्यामुळे आता ते मागचे काहीच काढत नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली. (bjp leader pravin darekar criticised on Shiv Sena)
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणलेला कायदाच शेतकऱ्यांसाठीचा आत्मा आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. ते केवळ स्वार्थासाठी हे करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीतला फरक कळतो, असे दरेकर यांनी सांगितले.
भाजपला सोडून शिवसेना जेव्हा महाविकास आघाडीसोबत गेली तेव्हा त्यांचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार कळले. राज्य सरकारने स्वत:च्या काळजात काय चाललंय यापेक्षा शेतकरी आणि जनतेच्या मनातील गोष्टी जाणून घ्याव्यात. काही दिवसांपूर्वी कृषी कायदे आणण्यासाठी याच राजकीय पक्षांनी खुलेआम पत्रक काढले होते, समर्थन दिले होते. त्यामुळे आजचा बंद हा शेतकऱ्यांचा आडून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली.
‘शरद पवारांचा बदललेला चेहरा लोकांसमोर आला’
शरद पवार यांच्या भूमिका आता कालानुरूप बदलत चालल्या आहेत. पवार साहेबांचे बदललेले स्वरूप देशासमोर आले आहे. स्वत: केंद्रीय मंत्री असताना पवार साहेबांनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून हा कायदा किती महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा काम केले होते. स्वामिनाथन आयोगाच्या गोष्टी त्यावेळी केल्या होत्या. मग आता मोदीजींनी हा कायदा आणला तर विरोध का, असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
‘शेतकरी आंदोलनात विघातक कम्युनिस्ट प्रवृत्ती’
केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. सरकार चर्चेपासून कधीच दूर गेले नाही. पण जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या उठवता येत नाही. या आंदोलनाला विरोधकांना मिटवायचे नाही तर हे आंदोलन चिघळवायचे आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सहभाग नाही, तर काही निवडक कम्युनिस्ट आणि विघातक प्रवृत्ती चा समावेश आहे. यात फक्त राजकारण चालू असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत, दिल्लीतील आजची स्थिती काय?
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
(bjp leader pravin darekar criticised on Shiv Sena)