VIDEO | सारं सुरळीत असताना नियती वाईट वागली, विजू मानेंनी काळजाला हात घातला, कविता ऐकतानाच एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर
"शिंदे साहेब तुमच्या सारखे कोणी नाही" असं म्हणज विजू माने यांनी स्वरचित कविता सादर केली. ही कविता म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवासच होता. माने कविता वाचत असतानाच एकनाथ शिंदेंच्या मनात आठवणींचा पट जागा झाला.
ठाणे : प्रख्यात दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी पांडू सारख्या नर्मविनोदी चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे, तसं ‘बायोस्कोप’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारख्या चित्रपटांतून संवेदनशील विषय हाताळत रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणीही आणलं आहे. मंगळवारी विजू मानेंनी राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Birthday) यांच्या काळजाला हात घातला. निमित्त होतं एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं. “शिंदे साहेब तुमच्या सारखे कोणी नाही” असं म्हणज विजू माने यांनी स्वरचित कविता सादर केली. ही कविता म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवासच होता. माने कविता वाचत असतानाच एकनाथ शिंदेंच्या मनात आठवणींचा पट जागा झाला. जुन्या स्मृतींमध्ये हरवून जात शिंदेंच्या डोळ्यांसमोरुन आठवणी फेर धरु लागल्या आणि एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आलं, हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. कविता ऐकतानाच एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर झाल्याचे क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (9 फेब्रुवारी) 58 वा वाढदिवस. त्या निमित्ताने शिंदेंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या ‘लोकनाथ’ या गीताचे, अर्थात ध्वनिचित्रफितीचे अनावरण करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यांनी आप्तस्वकीयांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी, बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, दिग्दर्शक विजू माने, अभिनेता प्रवीण तरडे यासारखे अनेक कलाकार आणि राजकीय नेतेही उपस्थित होते. दिग्दर्शक विजू माने यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली.
वाचा संपूर्ण कविता :
कुणासाठी साहेब आहात, कुणासाठी भाई कुणासाठी बाप-भाऊ, कुणासाठी आई उगा नाही जीव लावत लोक ठायी-ठायी खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
आज तुमच्या आयुष्यात वाढलं म्हणे एक वर्ष रस्तो-रस्ती, गल्लो-गल्ली ओसंडून वाहतोय हर्ष जमेल तसा घेईन म्हणतो परामर्श कारण शून्यातून साम्राज्य निर्मितीचा तुम्ही एक आदर्श
माफ करा मोठ्या मनाने चुकलं जर का काही खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
किसननगर जागा ती, त्यातल्या त्यात एक शहर एक माणूस राबायचा दिवस-रात्र अष्टौप्रहर वीस वर्ष वयापासून सांभाळत आलात घर रिक्षाचालक, रवी फिशरी, पॅकराईड बॉम्बे बिअर
राब राबताना कौतुकाने वहिनीबाई खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
दगदग जरी किती तरी लोक यायचेच प्रश्न घेऊन तुम्ही देखील लोकांसाठी घेतलंत स्वतःला वाहून धर्मवीर दीघे साहेबांनी हात फिरवला पाठीवरुन तुम्ही सुद्धा बाळासाहेबांना घेतलंत देव करुन
शिवसेना बनला श्वास, ध्यास पण आस मनी नाही खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
मोर्चे-आंदोलने रोजच होऊ लागली माणूस असा नव्हताच, ज्याची नड नाही भागली सारं काही सुरळीत असताना नियती वाईट वागली दीपेश शुभदा लेकरं हाती नाही लागली
एकामागून एक दुःख ईश्वर परीक्षा पाही खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
धर्मवीरांचा आदेश आला आजूबाजूला बघ दुःख मागे टाक, आता लोकांसाठी जग डोळे पुसून, जरा हसून उभे राहिलात मग समाजसेवा सवय झाली आणि शिवसैनिक नातलग
टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येणे नाही खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार कॅबिनेटची मंत्रिपदे, कामगिरी दमदार पावलावर पाऊल ठेवून लेकानेही घेतला भार इंडिया टुडेत पहिल्या दहात आमच्या कल्याणचे खासदार
जनसेवेच्या झऱ्याचं पुढल्या पिढीत पाणी जाई खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
आमचे इमले स्वप्नांचे, त्यांना वास्तव-विस्तव कुठून कळणार मागे कानावर चर्चा आली, साहेबांना खूप मोठं पद मिळणार एवढ्या वर्षांची मेहनत तुमची आता कुठे फळणार शक्तिस्थळावर एक आनंदाश्रू ढळणार
चुकलं-हुकलं आमच्याच चर्चा, तुमच्या ध्यानी-मनीही नाही खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
नाराजी नाही कुणाशी, खंत नाही कसलीच कशी कुठलाच कधी वाद नाही, ना विनाकारण मखलाशी भलेभले कॅमेरासमोर जेव्हा सहज पडतात तोंडघशी उठून दिसतात राजकारणात तुमच्या सारखे मितभाषी
भल्यामोठ्या भाषणाचं काम केवळ एका नजरेने होई खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
वादळ आला, कोरोना आला, तुम्हीच पुढे जर पूर आला एकुलता एक उपाय तुम्ही, जर कधी कुणाच्या धूर आला कान नजर तीक्ष्ण तुमची, वेगळा जर का सूर आला तेवढ्यापुरतं वाईट वाटतं, जवळचा जर का दूर झाला
निवडून आणलेत असे दगड, ज्यांच्या कुठल्याच खाणी नाही खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
मी तुमचा भक्त नाही, गुलाम नाही, भाट नाही शप्पथ सांगतो, मी उगाच गोडवे गात नाही तुमचा वाढदिवस म्हणून खोटी नाही करत वाहवा तुमच्या सारख्या लोकनेत्यांची खरंच आहे वानवा
बोलण्यासारखं खूप आहे निरंतर, निर्विवाद, थोडं थांबेन म्हणतो, मनापासून एकच साद साहेब, तुमच्यासाठी नाही, पण आमच्यासाठी एक काम करा हात जोडून सांगतो, थोडं जास्त वेळ आराम करा तुम्ही होता अॅडमिट तेव्हा सलाईन आमच्या मनाला लागतं देवी पद्मावती, नानासाहेब मन सगळ्यांकडून करुणा भाकतं एकनाथ साहेब, एक मान आमचा राखा तुमच्या शंभर वर्षांसाठी आमची काही घेऊन टाका आई भवानी तुझ्या चरणी फक्त एकच मागणं निरोगी आणि आनंदी कर आमच्या शिंदे साहेबांचं जगणं खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
एकनाथ शिंदेंच्या त्या बॅनरवरुन ‘भावी मुख्यमंत्री’ हटवलं! उलट सुलट चर्चेनंतर शिवसैनिकांचं पाऊल
ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घर देणारा “क्लस्टर” डेव्हलपमेंट प्रकल्प माझं स्वप्न : एकनाथ शिंदे