अब्दुल सत्तार पक्षात नको म्हणजे नकोच, भाजप कार्यकर्ते दानवेंच्या भेटीला
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.
औरंगाबाद : काँग्रेसचे सिल्लोडमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भाजपमधून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजपप्रवेशाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे.
सिल्लोडमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आणि काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना विरोध असल्याचे कळवले आहे.
दुसरीकडे, सहा जून रोजी आपल्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे अब्दुल सत्तार यां जाहीर केलं होतं. मात्र, आज 7 जून उजडलं, तरी भाजप प्रवेश गुलदस्त्यात आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश होणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.
भाजपचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध दर्शवला आहे. अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी 4 जून रोजी सिल्लोड येथे बैठकही आयोजित करण्यात आली होती.
कोण आहेत अब्दुल सत्तार : अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.
अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार?
अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबदमधील सिल्लोड मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषद आमदार सुभाष झाम्बड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर, अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या.
काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी जालन्यात जाऊन रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत 10 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जालन्यात सांगितले. या दहा आमदारांमध्ये अब्दुल सत्तार असण्याची दाट शक्यता आहे.
त्यातच गेल्या काही दिवसात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यापासून गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत राज्यातील भाजपच्या बहुतेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, आता भाजपकडूनच अब्दुल सत्तार यांच्या भाजपप्रवेशाला विरोध होताना दिसत आहे.