Narayan Rane : ‘गड आला पण सिंह गेला’! राजन तेलींच्या पराभवाबाबत नारायण राणेंची प्रतिक्रिया काय?
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारलं असता राजन तेली यांची वर्णी लावणार असल्याचं राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीत (District Bank Election) भाजपनं दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. भाजपनं 19 पैकी 11 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. असं असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना विचारलं असता राजन तेली यांची वर्णी लावणार असल्याचं राणे म्हणाले.
राजन तेली यांचा पराभव आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारलं असता, ‘गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिलीय.
कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार- राजन तेली
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 19 जागा न मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला तरी राजन तेली यांचा पराभव झाला आहे. पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली आणि शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यातील लढतीत नाईक यांनी तेली यांचा पराभव केला.
राणेंचा अजितदादांना टोला
ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
फडणवीसांकडून राजन तेलींचं कौतुक आणि सल्ला
या विजयात राजन तेली यांचीही मोठी मेहनत होती. त्यांचा पराभव झाला असेल. मात्र, त्यांनी खचून जायचं कारण नाही. कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झालाय. आम्ही राजन तेली यांना पुन्हा सल्ला देऊ की त्यांनी पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.
इतर बातम्या :