अजित पवार गटाकडून शरद पवार यांना पुन्हा धक्का, दौऱ्याआधी चौघांनी सोडली साथ
Ajit Pawar and Sharad Pawar NCP | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्हापातळीवरील महत्वाचे कार्यकर्ते आपल्या गटात खेचण्याची चढाओढ सुरु आहे. आता सोलापूरमध्ये शरद पवार गटाला अजित पवार गटाने धक्का दिला आहे.
सागर सुरवसे, सोलापूर दि.17 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. अजित पवार यांच्या गटाकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्हापातळीवरील महत्वाचे कार्यकर्ते आपल्या गटात खेचण्याची चढाओढ सुरु आहे. आता सोलापूरमध्ये शरद पवार गटाला अजित पवार गटाने धक्का दिला आहे. सोलापूरमध्ये शरद पवार यांचा दौरा होणार आहे. या दौऱ्यापूर्वी चौघांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे चौघे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहे.
अजित पवार यांची घेतली भेट
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला धक्का देण्यात आला आहे. सोलापूर शहरातील 4 माजी नगरसेवकांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या चौघांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
शरद पवार यांची साथ सोडणारे कोण आहेत
सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक इरफान शेख यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अजित पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत सोलापूर शहरातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. सोलापूरच्या विकासावर चर्चा झाली. यावेळी आनंद चंदनशिवे, तौफिक शेख यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आता सोलापुरात होणाऱ्या मेळाव्यात या चौघांचा प्रवेश होणार असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले.