गुणरत्न सदावर्ते यांना सर्वात मोठा झटका, 17 संचालक साथ सोडणार, एसटी कर्मचारी बँकेतील वर्चस्व धोक्यात
गुणरत्न सदावर्ते यांना सर्वात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक येथील एसटी कर्मचारी सोसायटीचे 17 पैकी सर्व 17 संचालक सदावर्तेंची साथ सोडणार आहेत. हे सर्व संचालक एक मोठ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सदावर्तेंना मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
भूषण पाटील, Tv9 मराठी, कोल्हापूर | 30 नोव्हेंबर 2023 : वकील गुणरत्न सदावर्ते यांना आणखी मोठा झटका बसणार आहे. कारण जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक एसटी कर्मचारी सोसायटीचे संचालक सदावर्तेंची साथ सोडणार आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचारी बँकेच्या 19 पैकी 14 संचालक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता खान्देशातील चारही जिल्ह्यांमधील सर्व 17 संचालक हे सदावर्तेंची साथ सोडणार आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचारी बँकेचे काही संचालक नॉट रिचेबल आहेत. ते अजूनही आलेले नाहीत. तसेच सदावर्तेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असं असताना आता जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक इथल्या कर्मचारी सोसायटीच्या सर्व 17 संचालकांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संचालकांचा मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश होणार
या सगळ्या संचालकांचा एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे सर्व पक्षप्रवेश केले जाणार आहेत. त्यामुळे सदावर्तेंना मोठा धक्का बसणार आहे. तसेच सदावर्ते यांच्या जनसंघमधील पदाधिकारी देखील या राजकीय पक्षात समावेश होणार आहेत, अशी देखील माहिती सूत्रांनी दिलीय.
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी बँकेत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या आठवड्यात संचालक मंडळाच्या बैठकीत केवळ 5 संचालकांनी हजेरी लावली होती. तर 14 संचालक हे गैरहजर होते. विशेष म्हणजे ते बैठकीच्या आधीपासून नॉट रिचेबल होते, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर आता 17 संचालक सदावर्तेंची साथ सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सदावर्तेंवर गंभीर आरोप
एसटी बँकेच्या कारभारावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. सदावर्तेंच्या मनमानीपणामुळे एसटी बँकेतून सभासदांनी कोट्यवधींच्या ठेवी काढून घेतल्या आहेत. डिपॉझिट रेटहून कर्जाचे रेट कमी ठेवणं, संचालकांचं न ऐकता कारभार करणं, असे सदावर्तेंवर आरोप आहेत. तसेच एसटी बँक ताब्यात घेतल्या-घेतल्याच त्यांच्या मनमानीपणामुळे बँक व्यवस्थापकाने राजीनामा दिल्याचा आरोप आहे. त्या जागेवर कोणताही अनुभव नसताना सदावर्तेंनी स्वत:च्या मेहुण्याला व्यावस्थापक केलं. बँकिंगचा कोणताही अनुभव नसताना 21 वर्षांचा सदावर्तेंचा मेहुणा व्यवस्थापक झाला. शिवाय त्या मेहुण्याला लाखांच्या आसपास पगार दिला गेला, असा आरोप करण्यात आलाय.