तर शिवसेना आपला अवतार दाखवेल; सुनील प्रभूंनी थेट राज्य सरकारलाच ललकारले
गुजरातला ज्या पद्धतीने उद्योग नेले जात आहेत. ते आता दिल्लीत जाऊन काय करणार? असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर लगावला.
गिरीश गायकवाड, मुंबई: दसरा मेळाव्यावरून शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवाजी पार्क मैदानातच दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यावरून शिवसेना नेते सुनील प्रभू (sunil prabhu) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक नेता, एक मैदान हे शिवसेनेचं समीकरण आहे. त्यामुळे दसऱ्या मेळाव्यासाठी आम्हाला शिवाजी पार्कवर परवानगी दिली नाही तर शिवसेना आपला अवतार दाखवेल, असा इशाराच सुनील प्रभू यांनी दिला आहे. तसेच न्यायालयाकडून (court) आम्हाला दिलासा मिळेल, अशी आशाही प्रभू यांनी व्यक्त केली.
सुनील प्रभू यांनी मीडियाशी संवाद साधताना ही दिलगिरी व्यक्त केली आहे. आमची नेस्कोवर बैठक होत आहे. या सभागृहातून रणशिंग फुंकल्यानंतर आमचा विजय निश्चित होतो, हा या सभागृहाचा इतिहास आहे. आता तुम्हाला भगवं वादळ आणि झंझावात पाहायला मिळेल. आज राज्याला दिशा देण्याचं काम होईल. मुंबईत महापौर आमचाच होईल. शिंदे गटाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असं सुनील प्रभू म्हणाले.
राहुल शेवाळेंना सांगणे आहे की शिवसेना तुम्ही सोडली, आम्ही नाही. आम्ही पाहू काय करायचं ते. जी पदं तुम्ही भोगली त्याची परतफेड करत आहेत. ज्यांनी विचारांची मर्यादा सोडली ते बोलत आहेत. ज्यांच्या विचाराने हे मोठे झाले त्यांच्या बद्दल असं बोलणं ही संस्कृती नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
गुजरातला ज्या पद्धतीने उद्योग नेले जात आहेत. ते आता दिल्लीत जाऊन काय करणार? असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर लगावला.
हिंदुत्व हे हिंदुत्व आहे. शिवसेनेला हिंदुत्वाबद्दल कोणी सांगू नये, असं सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख बोलतील तेव्हा तरुणांना वेगळी दिशा मिळेल. विरोधक काय बोलतात याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना शिवसेनेचं काम करत राहील, असंही ते म्हणाले.