थरथरत्या हाताने विधवा सुनेने लावले कुंकू, सुप्रिया सुळे यांचाही कंठ दाटला; हा भावूक व्हिडीओ होतोय व्हायरल
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी नागदे कुटुंबियांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
संतोष जाधव, टीव्ही9 प्रतिनिधी, उस्मानाबाद: आपल्याकडे आजही समाजात विधवा स्त्रीला (Widow) मानाचे स्थान नाही. विधवा स्त्रियांना आजही शुभ कार्यापासून दूर ठेवले जाते. महत्त्वाच्या कार्यक्रमातून डावलले जाते. त्यांच्याकडून आगत स्वागतही करून घेतले जात नाही. मात्र, समाजातील काही लोक त्याला अपवाद आहेत. ते आजही जुन्या प्रथांना फाटा देऊन नव्या वाटेवर जाताना दिसत आहेत. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे हे त्यापैकी एक. मुलाचं अकाली निधन झाल्यानंतर नागदे सुनेच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उस्मानाबाद (Osmanabad) दौऱ्यावर आले असता त्यांनी आपल्या विधवा सुनेच्या हातून कुंकू लावून सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं. त्यावेळी नागदे यांच्या सुनेचा हात थरथरला. पण सासऱ्याने खंबीरपणे सुनेला (Daughter In Law) साथ दिली. हे चित्रं पाहून सुप्रिया सुळेही भावूक झाल्या होत्या.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच सुनेच्या पाठी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी नागदे यांचं कौतुक केलं आहे. या प्रसंगाचा व्हिडीओही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. या व्हिडीओत विधवा सुनेकडून कुंकू लावून घेत असताना सुप्रिया सुळे भावूक झाल्याचं दिसून येत आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?
आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख खुप मोठं आहे. पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तो भरभरुन जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबियांनी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली, तेव्हा वसंतरावांचा हा एक वेगळाच पैलू पहायला मिळाला. त्यांच्या मुलाचं नुकतंच निधन झाले. मुलाच्या निधनाचं दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत.
त्यांनी सुनेच्या हातून आम्हा सर्वांचे स्वागत केले. स्वागताचे कुंकू लावताना सुनबाईंचा हात थरथरला. पण वसंतरावांनी तिला धीर दिला. हा सगळा प्रसंग अतिशय भावूक करणारा, नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता, असं त्यांनी म्हटलं आहे.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी नागदे कुटुंबियांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
याप्रसंगी जीवनराव गोरे, भुम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे, वैशाली मोटे, सक्षणा सलगर, सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.