हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी लक्षात आलं; सुरेश धस आणि मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील गुप्त भेटीची बातमी फुटली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाली. त्यामुळे आता या भेटीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ही या भेटीवरून धस यांच्यावर अविश्वास दाखवला आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तर या भेटीवरून सुरेश धस यांना चांगलंच फटकारलं आहे. हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी सर्व काही लक्षात आलं, असं सूचक विधान करत मनोज जरांगे पाटील यांनी संतापही व्यक्त केला आहे. तसेच सुरेश धस यांनी भेटणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एखाद्या माणसाच्या अंगात इतका वेगळेपणा असू शकतो हे पहिल्यांदा पाहायला मिळालं. क्रूर हत्या झाली, याचं यांना काही वाटलं नाही. एखादं पद देतील किंवा लाभ होईल म्हणून तुम्ही भेटता हे चुकीचं आहे. या गुप्त भेटीची माहिती ज्याने बाहेर आणली त्याला मार्क दिले पाहिजे. त्याच व्यक्तीने खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा केला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
गुप्त भेटीची गरज काय होती?
गुप्तपणे भेटण्याची गरज काय होती? हा खून दाबण्याचा प्रकार आहे. धनंजय मुंडे यांना असं झालं तरी काय होतं? ते कोणत्या कोमात गेले होते? त्यांना काय भेटायचं? ते काय समाजापेक्षा मोठे आहेत काय? या मागचा राजकीय स्वार्थ काय? असा सवाल करतानाच एक चोर डाका टाकणारा, चार चार साडेचार तास कट शिजवतो, हे काही आम्हाला कळत नाही का? साडेचार तास बैठक झाली हे आता बावनकुळे यांनीच सांगितलंय, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
त्याने तर मानच छाटली
चोर, डाके टाकणे यापेक्षा यांना भारी उपमा दिली पाहिजे. आम्ही धस यांच्या खांद्यावर मान टाकली. सर्व निर्धास्त झोपले. त्यांनी तर मानच छाटली. इकडे तिकडे भेटून संतोष अण्णांसाठी असंच भेटणार का?, असा सवाल करतानाच हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी मला हे लक्षात आलं होतं. धस यांच्या मागे आमदार, खासदार, मुख्यमंत्री कोणीच नसताना ते निवडून आले आहेत. तुम्ही क्रूर व्यक्तीला भेटून आलाय, असा हल्लाच त्यांनी चढवला.
तर धसच जबाबदार
संतोष देशमुख यांची हत्या करून बीडचा विकास कसा करायचा आहे? तुमची अस्मिता मेलीय का? तुम्ही खून पचवणार असाल तर तुमच्यासारखे महापापी नाही. चंद्रशेखर बावनकुळे जर मिटवून घ्या म्हणत असतील तर धनंजय मुंडे 302च्या प्रकरणात आहेत, असा त्याचा अर्थ होतो. जो माणूस चार घंटे बसून चर्चा करतो, त्याच्यावर आता काय विश्वास ठेवावा? संतोष अण्णा खून प्रकरणं दाबलं गेलं तर त्याला धसच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.