Ajit Pawar | ‘भेळ हवीये भेळ?’, अजित पवारांच्या दुपारच्या शपथविधीनंतर तेजस्विनी पंडितच्या ट्विटची चर्चा
अजित पवार यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
मुंबई : आज (रविवारी) दुपारी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या बंडखोरीची जोरदार चर्चा होत आहे. राज्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवारांसोबतच 9 आमदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या सर्व घडामोडींमुळे राज्याचं राजकारण चांगलंच खवळलं आहे. त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटची जोरदार चर्चा आहे. तेजस्विनीने तिच्या ट्विटद्वारे या घडमोडींवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
‘भेळ हवीये भेळ? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल,’ असं ट्विट तेजस्विनी पंडितने केलं आहे. या ट्विटद्वारे तिने एकंदर राजकीय घडामोडींवर उपरोधिक निशाणा साधला आहे. तिच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मतदान कार्ड विकायची वेळ येणार नाही ना’, असा सवाल एकाने केला. तर ‘ज्यात शेंगदाणे खारट, बेचव फरसाण, सडलेला कांदा आणि आता राहिलेलं हे कडवट लिंबू पिळलं गेलंय. आता खा आणि ओका अशी अवस्था महाराष्ट्रातल्या लोकांची झाली आहे’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली. ‘पावसाळा सुरू होतोय न होतोय तोवर चिखलात लोळायला सुरुवात’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
अजित पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळपासूनच भाजप आणि शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरु होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमोल कोल्हेही यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवार यांना समजावण्यासाठीच आमदारांनी त्यांच्या घरी धाव घेतली असावी, अशी चर्चा होती. अजित पवार यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
तेजस्विनीचं ट्विट-
भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!! #Maharashtrapolitics
— TEJASWWINI (@tejaswwini) July 2, 2023
दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडाशी आपला काहीच संबंध नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “मी खंबीर आहे. लढायला मजबूत आहे”, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जे आमदार गेले आहेत. त्यातील 80 टक्के आमदार संध्याकाळपर्यंत परत येतील, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.