शेतकऱ्यांच्या परिस्थितीस ठाकरे सरकार जबाबदार; विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका
संवेदनहीन ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
जालना : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहात आहे. परंतु संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दांत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. (Thackeray Government is responsible for farmers worst situation says Pravin Darekar)
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांनी आज जालन्यात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सरकारला शेतकरीविरोधी म्हणत धारेवर धरले. माजी मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदी मंडळी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
मराठवाड्यातील भीषण वास्तव मांडताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या प्रकारे शेतकरी उद्ध्वस्त झाला त्यावर सरकारने गतीने उपाययोजना करणे आवश्यक होते, पण तसे काही झाले नाही. मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभूतपूर्व पाऊस पडला आहे. एकीकडे धरणे भरली आहेत त्याचा आनंद होत आहे, पण दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याचे दुःख पाहायला मिळत आहे.
यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या पावसामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. साधारण तीन लाख 89 हजार शेतकरी बांधव नुकसानग्रस्त झाले आहेत. सरकारी आकड्यांमध्ये ही संख्या तीन लाखांवर आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मोसंबी आणि तुरीची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिने झाले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की सरसकट पंचनामे करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करा, भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मागणी केल्याचे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी बागायतदार शेतकऱ्यांना 50 हजार प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 हजार प्रति हेक्टरी मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पीक विम्यांचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे, अशा तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
फुलंब्री, कन्नड या ठिकाणी 90 टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे भरले, परंतु त्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. जालना मधील बदनापूर, रोशनगावमधील शेतकऱ्यांनाही विम्याचे पैसे मिळाले नाहीत. असा भोंगळ कारभार या ठिकाणी सुरु आहे.
विमा कंपनी म्हणते शासनाकडून जे पंचनामे केले जातील ते आम्ही ग्राह्य धरणार नाही. आमची माणसं प्रत्यक्षपणे तिथे जाऊन तपासणी करतील आणि त्यानंतर रक्कम ठरवली जाईल. म्हणजे अजून सहा महिने आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवण्याकरता वाट पाहावी लागेल. विमा कंपन्यांकडे यंत्रणा नाही, माणसं नाहीत अशात हे लोक पंचनामे कधी करणार आणि कधी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणार? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्याला आपल्या कष्टाचे पैसे भरूनही त्याला विम्याचे पैसे मिळत नाहीत या बाबतही मी शासनाला सूचना दिल्या आहेत. या सर्व मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडू, जर आठवड्याभरात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाही तर भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अशी परिस्थिती उद्भवली होती तेव्हा 18 हजार प्रति हेक्टर शेतकऱ्याला मदत दिली होती. जनावरांसाठी पैसे दिले होते. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पैसे देण्यात आले. एवढेच नव्हे तर ज्यांची घरं पडली, जे लोक विस्थापित झालेत त्या कुटुंबांना पैसे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आलं. संवेदनशील भावनेने नियम, निकष यांचा विचार न करता माणुसकी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा या विचाराने जर सरकारने प्रयत्न केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. या सरकारची संवेदना हरवली आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
तसेच जालना जिल्ह्यातील तालुका अंतरवाला व गोलापांगरी या गावांतील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीची ही पाहणी केली आणि तेथील नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला. pic.twitter.com/LM9Cf68tn6
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 3, 2020
राज्याचे कृषीमंत्री अतिवृष्टी झालेल्या भागाच्या दौऱ्यावर आले आणि निघून गेले, त्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. मराठवाड्यात उद्भवलेली परिस्थिती भयंकर आहे. हे सरकार शेतकऱ्याला गृहीत धरत आहे. सरकार येण्यापूर्वी प्रचाराला जेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दौऱ्यावर आलेले होते तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना 50 हजार प्रति हेक्टर मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
दुसरी अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही, याचे स्मरण करुन देताना दरेकर यांनी सांगितले की, त्यावेळी शिवसेनेने विमा कंपनीचे कार्यालय फोडले होते, मोर्चे काढले होते, आज विम्याची काय परिस्थिती आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे शिवसेनेच्या कृतीबद्दलचा तीव्र असंतोष शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि या असंतोषाचा बांध फुटू नये याची काळजी शासनाने घ्यावी अशी टीकाही त्यांनी केली.
आज जालना जिल्ह्याच्या बदनापुर तालुक्यातील घोपटेश्वर आणि रोशनगावातील नुकसान ग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला आणि तेथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तेथील परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे. pic.twitter.com/wa1ARCrwXb
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 3, 2020
या मागण्यांसोबत अश्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेती नापिक झाली आहे. शेतीची स्थिती पूर्ववत करण्याएवढी क्षमता शेतकऱ्यांमध्ये नाही याकडेही शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मदतीला उभं राहावं, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी दरेकर यांनी आजच्या आपल्या जालना दौऱ्यात बदनापूर तालुक्यातील घोपटेश्वर, रोषणगाव तसेच जालना तालुक्यातील गोलापांगरी, अंतरवाला येथील अतिवृष्टी झालेल्या व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांची नुकसानाभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या
…तोपर्यंत टीव्हीवाले आपल्याकडे बघत नाहीत हे दरेकांना चांगलं माहीत : गुलाबराव पाटील
महाराष्ट्राची आर्थिक घडी सावरण्यासाठी पवार सरसावले; अनिवासी भारतीयांशी ऑनलाईन संवाद
(Thackeray Government is responsible for farmers worst situation says Pravin Darekar)