Sanjay Raut : बंडखोरांचे मंत्रीपद जाणार, 16 आमदार ईडीच्या भीतीनेच पळाले, संजय राऊत यांचं वक्तव्य
Sanjay Raut : ज्या आमदारांविरोधात किरीट सोमय्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेतल्या त्या आमदारांवरील केसेस भाजपने 24 तासांत क्लिअर केल्या असेही राऊत यावेळी म्हणालेत. कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करेल, असा ठाम विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्द एकनाथ शिंदे असा संघर्ष निर्माण झालाय. यातच शिवसेनेच्या (Shivsena) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली. यानंतर हा वाद वाढतच गेला. दरम्यान, ‘हिंदुत्व आणि निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन बंडखोरी करणाऱ्या आमदारांचे हिदुत्व सपशेल खोटे-बहाणेबाज असून शिवसेनेचेच हिंदुत्व खरे आहे. बंडखोरी करणाऱ्या तब्बल 16 आमदारांना ईडीच्या कारवाईची भीती आहे. एकानथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी फक्त तोंडी लावायच्या आहेत, असे सांगतानाच, बंडखोर आमदार लालसा, महत्वाकांक्षा आणि आमिषामुळे पळाले असल्याचा घाणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान केलाय. यामुळे पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे, असा संघर्ष वाढल्याचं दिसतंय.
भाजपला शिंदे नको होते?
भाजपने बेइनामी केली नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. तेव्हा भाजपलाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. 2019ला भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले असते, असे प्रतिपादनही राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलाना केलंय. तीन पक्ष एकत्र आल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, कोरोनासारख्या भयंकर संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि पक्षाची दुहेरी जबाबदारी सांभाळली. ते आमदारांशी संवाद साधत नाहीत, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिघेंच्या नावानं राजकारण करू नका, असंही राऊत यावेळी म्हणालेत.
आघाडी टिकवण्यासाठी पवारांचे प्रयत्न
‘शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या बंडखोर आमदारांना शिवसेनेने मेहनतीने मोठे केले. त्यामुळे या बंडखोर आमदारांना पुन्हा मत देणार नाही. ज्या आमदारांविरोधात किरीट सोमय्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेतल्या त्या आमदारांवरील केसेस भाजपने 24 तासांत क्लिअर केल्या असेही राऊत यावेळी म्हणालेत. कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करेल, असा ठाम विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. राजकारण ही पवारांची ऊर्जा आहे. त्यामुळे ते आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगतिले.
एकनाथ शिंदेंची वेळ निघून गेली
शिवसेना एक ब्रँड आहे. त्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणार आहे. याआधीही अनेक बंड केले. शिवसेनेला या बंडांची सवय आहे आणि अशा बंडांशी लढून जिंकण्याचीही सवय आहे. आजवर शिवसेनेच्या पाठीवर अनेक वार झाले आहेत. मात्र, बाळाहासाहेबांनी अशा गद्दरांना कधी माफ केले नाही. एकनाथ शिंदेंना शिवसेनेने अनेक संधी दिल्या. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता वेळ निघून गेली आहे. पक्षप्रमुखच निर्णय घेतील, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.