Aurangabad | नगरपालिका निवडणुकांसाठी सोमवारी आरक्षण सोडत, औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या नगरपालिकांचा समावेश?
राज्यभरातील 216 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद नगरपालिकांची आगामी निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण (Reservation) सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबादचे जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. जिल्ह्यातील कन्नड (Kannad), पैठण, गंगापूर आणि खुलताबाद नगरपालिकांमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांच्या आरक्षित जागा निश्चित करण्याचा आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 13जून रोजी म्हणजेच सोमवारी प्रक्रिया होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिली.
कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर आणि पैठण नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी 2022 पूर्वी तर खुलताबाद नगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 पूर्वी होणे आवश्यक होते. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. या नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे.
13 जून रोजी सकाळी 11 वाजता सोडत
जिल्ह्यातील उपरोक्त चारही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत सूचना आल्या आहेत. उद्या सोमवारी 13 जून रोजी सकाळी 11 वाजता आरक्षणाची सोडत होणार आहे. यात अध्यक्षस्थानी त्या त्या विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित राहतील. कन्नड नगरपालिका सभागृह, पैठणच्या पंचायत समिती सभागृहात, गंगापूरच्या पंचायत समिती सभागृहात तर खुलताबाद येथील नगरपालिका सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात येईल.
राज्यातील किती नगरपरिषदांसाठी सोडत?
राज्यभरातील 216 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.