Uddhav Thackeray : ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा, उगाच नाटकं करू नका; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना बजावलं
Uddhav Thackeray : आज हे मुळावर घाव घालायला निघाले आहेत. ज्याला आपले मानत होतो. ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं.
मुंबई: आमदार आणि खासदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) अधिकच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता पक्षात झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार आणि खासदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो. पण असल्या प्रकाराला लोकशाही म्हणत नाहीत. तुम्ही मनाने गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला कोंडून ठेवू शकतो? त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. मी आजही कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनाही सांगितलं, ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा. नाटकं करू नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना (shivsena) बजावलं. उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्या ज्यावेळी जे काही मिळालं ते आनंदाने उपभोगलच ना? मग आता कशाला रडताय? असा टोलाच उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री रामदास कदम (ramdas kadam) यांना नाव न घेता लगावला. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला ऑनलाईन संबोधित करत असताना त्यांनी हा टोला लगावला.
बंडखोरांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरे जावं. मतं मिळवावीत. पण ही हिंमत यांच्यात नाही. कारण हे खरे मर्दच नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणं, दुसऱ्याचं चिन्हं चोरण्याचा प्रयत्न करणं ते चोरलं जाऊच शकत नाहीत. दुसऱ्याच्या पक्षाचं नाव चोरणं ते चोरलं जाऊच शकत नाही. याला हिंमत लागते, हे चोरांचं काम आहे. आता जे काही चाललं आहे. त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांना बोंबलायचं तर बोंबलू द्या. काही दिवस हा खेळ चालेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
शिवसैनिक तुम्हाला ओळखून आहेत
तसं पाहिलं तर आमदार आणि खासदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो. त्याला लोकशाही म्हणत नाही. तुम्ही मनाने गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला कोंडू शकतो. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. मी आजही कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनाही सांगितलं ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा. नाटकं करू नका. उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं. शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्याही तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका. शिवसैनिक तुम्हाला पुरतं ओळखून आहेत, अशा शब्दात त्यांनी रामदास कदम यांच्यावर नाव न घेता टीका केली.
तोपर्यंत मातोश्रीवर येऊ नका
तुम्हाला अॅफिडेव्हिट करून घेण्याचं काम करून दिलं आहे. नोंदणी करून घ्यायची आहे. ही नोंदणी करायची आहे. अकलकुवात आजच अडीच हजार नोंदणी झाली. मी म्हटलं मला पाच हजार पाहिजे. जे पाच हजार सांगत आहेत. त्यांना सांगतो मला दहा हजार पाहिजे. हे काम सहज होऊ शकतं. जर शिवसैनिक चवताळून उठला तर तो काही करू शकतो. ते काम दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता करू शकत नाही. तुम्हाला एकच काम देतोय. नोंदणी, नोंदणी आणि नोंदणी. याच्यापलिकडे तुम्ही काही पाहू नका. राजकारणात कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे काम दिलं ते आठ दिवसात पूर्ण करा. जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम सहानुभूती आहे. तीव्र राग आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा. ही आलेली संधी आहे. एकदा आपण 50 लाखाचा टप्पा पार केला तर नोंदणीचे गठ्ठेचे गठ्ठे घेऊन या. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याती मी दौरे करणार आहे. गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांसोबत घेऊन काम करा. इकडे येऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.
तर भाजप त्यांना फेकून देईल
आज हे मुळावर घाव घालायला निघाले आहेत. ज्याला आपले मानत होतो. ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. जो बाळासाहेबांचाही होता. मागितलं तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा राहिलो आहे. ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे. तुम्ही सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजप असू दे की हे गद्दार नामर्द असू दे. मला त्यांची पर्वा नाही. ते काही काळ सत्ता उपभोगतील. पण जेव्हा भाजपला कळेल हे काडीच्या कामाचे नाही तेव्हा भाजप त्यांना फेकून देईन, असा दावाही त्यांनी केला.