तो तर महाविकास आघाडीचा मेळावा, उदय सामंतांनी उडवली खिल्ली; आणखी काय म्हणाले?
आमची खरी शिवसेना आहे आणि त्यांचा मेळावा होणार आहे. हा अभूतपूर्व असा मेळावा होणार आहे, असं अडसूळ यांनी स्पष्ट केलं.
अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अवघे दोन दिवस उरलेले आहेत. दोन्ही गट शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. मात्र, ही तयारी करताना दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीकाही केली जात आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची (Dussehra rally) खिल्ली उडवली आहे. आमचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा मेळावा नाही. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळत आहे आणि काल त्यांच्या गटातील नेते हे भारत जोडो अभियानाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे त्यांचा होणारा हा दसरा मेळावा हा शिवसेनेचा नसून हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे, अशा शब्दात उदय सामंत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली.
उदय सामंत हे बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी महापालिका निवडणुकांवर बोलणं यावेळी टाळलं. निवडणूक आयोगाच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची खरी शिवसेना आहे आणि त्यांचा मेळावा होणार आहे. हा अभूतपूर्व असा मेळावा होणार आहे, असं अडसूळ यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही यावेळी मैदानाची पाहणी केली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असा हा दसरा मेळावा होणार आहे. मुंबईकराना कुठे ही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पार्किंगची व्यवस्था ही योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. बीकेसीमधील जे मोकळे भूखंड आहेत त्यांचा उपयोग पार्किंगसाठी करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्याला महिलांची मोठी गर्दी असणार आहे, असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.