Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या, प्रश्नांना वाचा फोडा; उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना
उद्धव ठाकरे यांनी आमदारांना महत्वाच्या सूचना केल्या. मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार. विधानसभेत विविध विकासकामांचे प्रश्न लावून धरा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केल्यात.
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर आमदारांची बैठक बोलावली होती. उद्यापासून सुरु होणारी महाप्रबोधन यात्रा, सुप्रीम कोर्टाचा निकाल, पावसाळी अधिवेशन आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही बैठक बोलावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना महत्वाच्या सूचना केल्या. मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार. विधानसभेत विविध विकासकामांचे प्रश्न लावून धरा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केल्यात. या बैठकीला विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), खासदार विनायक राऊत, विलास पोतनीस, प्रकाश फार्तपेकर, राजन साळवी, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, रवींद्र वायकर, विधान सभा आणि परिषदेचे आमदार बैठकीला उपस्थित होते.
आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. विधानसभेत विविध विकासकामांचे प्रश्न लावून धरा. अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अशावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका सभागृहात मांडा. संघटनात्मक पक्षवाढीसाठी सगळ्यांनी एकत्र काम करा. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडा. केलेली कामं लोकांपर्यंत घेऊन जा. गणेशोत्सवानंतर मी राज्याचा दौरा करणार आहे. कमी दिवसाचं जरी अधिवेशन असलं तरी सभागृहात मुद्दे लावून धरा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्यात.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा – अहिर
दरम्यान, बैठकीनंतर आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी चर्चा केली. सुप्रीम कोर्टात तारखेवर तारखा मिळतात. त्याच्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. अतिवृष्टीत शेतकऱ्याला मदत कशी मिळेल यावरही चर्चा झाली. यात्रेबाबत अजूनही कोणतं नियोजन नाही. आम्हाला काही आदेश नाहीत. गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं अहिर म्हणाले. तसंच अफजल खान वधाची परवानगी मागितली आहे. अफजल खान वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे हे नाकारण्याचं कारण नाही, असं अहिर यांनी सांगितलं.
विधीमंडळातील कामकाजाचा उद्धव ठाकरेंकडून आढावा
विधीमंडळात काय चाललंय याबद्दल आमदारांची चर्चा केली, आढावा घेतला गेला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता. शासन म्हणून का मान्य होत नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला, पक्ष संघटनेबाबतही आढावा घेतला. राजकीय हस्तक्षेप करुन निवडणुका पुढे घेऊन जात असतील. महापालिकेचे लोकप्रतिनिधी नसणे घटनेप्रमाणे योग्य नाही. लोकांचा प्रतिनिधी नसणं हे देखील योग्य नाही, असंही सचिन अहिर यांनी सांगितलं.