शरद पवार यांचं वय झालं म्हणजे काय झालं? मग त्यांचे आशीर्वाद कशाला घेता?; उद्धव ठाकरे यांनी अजितदादांना खडसावलं
शिवसेनेला सोडून गेलेल्या गद्दारांची माझ्याकडे येण्याची हिंमत झाली नाही. ते माझ्याकडे येऊच शकत नाही. त्यांची हिंमतच नाही. त्यांना माझा स्वभाव माहीत आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजे बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे.
मुंबई | 27 जुलै 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तुमचं वय झालं. आता निवृत्त व्हा असा सल्ला दिला होता. अजित पवार यांच्या या सल्ल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार यांचे वय झाले म्हणजे काय झाले? वय झालं तर मग आशीर्वाद कशाला घेता? असा सवालच उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
अजित पवार यांचं मत अत्यंत वाईट होतं. ज्यांच्याकडून सर्व काही घेतलं, त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. आपण वडीलधाऱ्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. वय झाले म्हणजे काय? मग आशीर्वाद कुणाकडून घ्यायचे? अजितदादा यांचं ते विधान मला अजिबात आवडलेलं नाही. तुमचं पटत नसेल तर जाहीर सांगा. या वयातही त्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं. आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात ते पटत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना खडसावलं. दैनिक ‘सामना’साठी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केलं.
खुशाल सांगून जावं
केवळ अजित पवारच नाही तर ज्यांना कुणाला स्वार्थासाठी बाहेर पडायचं त्यांनी मी स्वार्थासाठी जातोय असं सांगून खुशाल जावं. असं सांगितलं तर लोक तुम्हाला स्वीकारूही शकतील. पण चार चार पाच पाच वेळा सर्व काही दिल्यानंतरही अन्याय झाला हो… असं म्हणून टाहो फोडून जाणं योग्य नाही. मग त्यात आमच्या पक्षातील गद्दार असतील किंवा इतर सगळ्याच पक्षातील गद्दार असतील, असंही त्यांनी ठणकावलं.
सगळे पुतणे गेले कुठे?
पुतण्यांमुळे अनेक पक्ष अडचणीत आलेत असं वाटत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर, हो, पण आता पुतणे गेलेत कुठे? आता सगळे पुतणे कोण गोळा करतंय? हे पुतण्यांचं तण… हे सगळे कुणाच्या पारड्यात पडले? जे घराणेशाहीला विरोध करत आहेत, तेच घराणी फोडूनच घेताहेत ना, असा टोला त्यांनी भाजपचं नाव न घेता लगावला.
त्यांची हिंमतच नाही
मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राष्ट्रवादीचे फुटीर शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले, असं उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर, शिवसेनेला सोडून गेलेल्या गद्दारांची माझ्याकडे येण्याची हिंमत झाली नाही. ते माझ्याकडे येऊच शकत नाही. त्यांची हिंमतच नाही. त्यांना माझा स्वभाव माहीत आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजे बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे, असंही त्यांनी ठणकावलं.