‘गौतम अदानी यांची चौकशी करुच नका’, उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
"गौतम अदानी यांच्याबाबतीत चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तुमचं काय मत आहे? तुमच्यापर्यंत विषय पोहोचलाय. माझं वेगळं मत आहे. अदानींची चौकशी करुच नका", असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील वज्रमूठ सभेत भाषण करताना राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांच्या जीपीएस चौकशीच्या मागणीवही भूमिका मांडली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जीपीएस चौकशीची काही गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांची चौकशी करुच नका तर त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा की, श्रीमंत कसं व्हायचं, असं उपरोधिक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.
“गौतम अदानी यांच्याबाबतीत चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तुमचं काय मत आहे? तुमच्यापर्यंत विषय पोहोचलाय. माझं वेगळं मत आहे. अदानींची चौकशी करुच नका. कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे, एक माणूस मेहनत करुन एवढ्या वरती जात असेल तर त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा की, श्रीमंत कसं व्हायचं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“चौकशी पाहिजे की श्रीमंती पाहिजे? बरोबर ना! मी कुठे म्हणतोय ते गुन्हेगार आहेत. चौकशी करा म्हणतच नाहीत. पण निदान त्यांनी काय केलं जे कष्ट करणारी लोकं घाम गाळून सुद्धा त्यांना रोजची चिंता असते की, संध्याकाळी घरची चूल कशी लागेल. त्यांना ते मार्गदर्शक होईल ना. अदानी व्हायचंय मला. आम्ही अडाणी आहोत, अदानी व्हायचं आहे”, असा टोल उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?
महाराष्ट्राने रक्त सांडून बलिदान देऊन आपली स्वतःची हक्काची ही राजधानी मिळवली आहे. ही लढून मिळवलेली राजधानी आहे. काल मध्यरात्री बारा वाजताच मी आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा सर्व शिवसैनिक जमले होते. अरविंद सावंत होते.
महाराष्ट्र दिवस एकवेळेस सुरू झाला की साधारणपणे मध्यरात्रीपासून आपण तिकडे सजावट करतो, घोषणाही करतो, पण काल आम्ही तेव्हा पोहोचलो तोपर्यंत सरकारकडून आणि महापालिकेकडून कोणी तिकडे फिरकलेला नव्हता. संपूर्णपणे फुलांची जी काही सजावट होती ती आपल्या शिवसैनिकांनी केली होती. तिकडे हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत असताना अभिवादन करताना मला एक सांगायचे की, त्यांनी लढा दिला नसता, संघर्ष केला नसता तर आज गद्दारी करून का होईना पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा सर्वसामान्यांनी दिला होता. मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षक सत्तेत बसला होता. मुंबई, गुजरातमध्ये गोळीबार केला होता. अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण गिरणगाव पेटला होता. पोलीस एवढे मातले होते की इमारतींवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. अनेकजण गुदरमरले. महिला रणरागिनी, तान्ही बाळं घेऊन रस्त्यावर उतरल्या आणि हिंमत असेल तर गोळ्या घाला, पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं महिला म्हणाल्या होत्या.