आताची मोठी बातमी, प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे मविआच्या बैठकीत?
महाविकासआघाडीमध्ये आता चौथ्या पक्षाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्यानंतर आता महाविकासआघाडीमध्ये हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) यांच्यातील १ तासाहून अधिक काळ चाललेली बैठक संपल्यानंतर आता महाविकासआघाडीची बैठक (Mahavikas Aghadi) होत आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे पोहोचले आहेत. त्यामुळे आता महाविकासआघाडीत चौथा पक्ष सहभागी होणार आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी बंगल्यावर मविआची थोड्याच वेळात बैठक होत आहे. या बैठकीसाठी सुभाष देसाई, अशोक चव्हाण, छगन भुजबळ दाखल झाले आहेत. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात दीड तास चर्चा झाली. यानंतर आता वंचितचा प्रस्ताव मविआच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीतली युती अंतिम टप्प्यात आली आहे. वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत उद्धव ठाकरेंनी विषय मांडावा असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती tv9 मराठीला सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी म्हटलं की, ‘महाविकास आघाडीला मजबूत होण्याच्या दृष्टीने हे एक चांगलं पाऊल असेल. प्रकाश आंबेडकर हे जेष्ठ नेते आहेत.सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षानी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनीं करायला हवं. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र घेऊन काम केलं तर निश्चितच स्वागत असेल. ती आनंदाची बाब आहे.’