उद्धव ठाकरे सुन्न, रश्मीताईंना अश्रू अनावर, दुर्गा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो कार्यकर्ते दाखल
ठाकरे कुटुंबाने दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी दाखल होत अंत्यदर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले.
मुंबई : युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं काल रात्री उशिरा दीड वाजेच्या सुमारास निधन झालं. ठाण्यात काल महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जनआक्रोश मोर्चात घोषणाबाजी करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांची रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मुंबईत पेडर रोड परिसरात दाखल झाले.
ठाकरे कुटुंबाने दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी दाखल होत अंत्यदर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबाकडून दुर्गा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. दुर्गा भोसले यांच्या सारख्या पदाधिकाऱ्यांचं निधन ही पक्षाची मोठी वैयक्तिक हानी असल्याचं मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर काल ठाण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात तीनही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तीनही पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या मोर्चात बघायला मिळाली. या मोर्चात एक अतिशय दुखद घटना घडली. युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं निधन झालं. दुर्गा या मोर्चात जोरजोरात घोषणाबाजी देत होत्या. पण मोर्चादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. पण रात्री उशिरा दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे. आज सायंकाळी 5 वाजता धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेकडो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या घटनेमुळे सुन्न झालेले बघायला मिळत आहेत.
दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या निधानावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ताई परवाच आपले फोनवर बोलणे झाले आणि ताई तुम्ही हिंगोली जिल्ह्यात पक्षाची चांगली बांधणी करा असा सल्ला दिला. आपलं विविध विषयांवर बोलणे झालं. पण ताई तुमच्या अश्या अचानक सोडून जाण्याने आमचा आधारवड गेला. श्रद्धांजली वहावी असं तुमचं वय नाही… दुर्गा ताई. विश्वास बसत नाही या दुःखद वृत्तावर. सदैव हसतमुख, खूप प्रेमळ अशी आपली सर्वांचीच प्रचंड लाडकी दुर्गाताई अचानक आपल्याला सोडून गेली, अशी प्रतिक्रिया डॉ. रेणुका पतंगे यांनी व्यक्त केली आहे.