Uddhav Thackeray : मानेखालची सर्व हालचाल बंद, पोटही हलत नव्हतं, त्या गोल्डन अवरमुळेच मी तुमच्यासमोर; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ दाहक अनुभव
Uddhav Thackeray : तर मी बरा होऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडून बसलेले होते. जे लोक देव पाण्यात बुडवून बसलेले होते. ते लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत, असं ते म्हणाले.
मुंबई: शिवसेनेतील (shivsena) बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पहिल्यांदाच दीर्घ मुलाखत दिली आहे. दैनिक ‘सामना’त दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत शिंदे गटासह भाजपवरही (bjp) घणाघाती हल्ला केला. तसेच रुग्णालयात असतानाचा दाहक अनुभवही कथन केला. मी आजारी पडल्यानंतर काही लोकांना मी बराच होऊ नये असं वाटत होते. मी बरा होऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात घालून बसले होते. तर काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवाकडे धावा करत होते. मी रुग्णालयात असताना मला याची माहिती मिळत होती, असं सांगतानाच ऑपरेशन झाल्यानंतर दोन दिवसाने माझ्या मानेखालची हालचाल अचानक बंद झाली होती. पोटही हालत नव्हतं. पण डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. त्या गोल्डन अवरमध्ये डॉक्टरांनी तात्काळ उपचार केल्याने मी आज तुमच्यासमोर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
रुग्णालयात माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेमुळे मी बराही झालो होतो. त्यानंतर सात एक दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलं उद्या आपल्याला जीना चढायचा आहे. मीही त्या मानसिक तयारीत होतो. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आळस देत असताना माझ्या मानेत क्रॅम्प आला. अचानक मानेखालची सर्व हालचाल बंद झाली. पोटही हलत नव्हतं. माझी सर्व हालचाल बंद झाली. एक ब्लड क्लॉट आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने माझ्यावर उपचार सुरू केले. गोल्डन अवरमध्ये माझं ऑपरेशन करण्यात आलं. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले
त्यावेळी माझे हातपायही हलत नव्हते. बोटंही हालत नव्हती. डास किंवा मुंगी चावली तर खाजवायचं कसं? याचंही टेन्शन आलं होतं, असं सांगतानाच मी रुग्णालयात असतानाच काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवाकडे धावा करत असल्याचं मी ऐकलं. तर मी बरा होऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडून बसलेले होते. जे लोक देव पाण्यात बुडवून बसलेले होते. ते लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत, असं ते म्हणाले. काही लोक तर आता मी बरा होत नाही. मी उभा राहत नाही असंही सांगत होते, असंही त्यांनी सांगितलं.
पक्ष प्रोफेशनली चालवत नाही
शिवसेनेविरोधात सतत विश्वासघाताचं राजकारण का होतं? यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही पक्ष प्रोफेशनली चालवत नाही. त्यामुळे हे प्रकार होतात. मी लोकांवर विश्वास टाकतो. शिवसेना एक कुटुंब म्हणून बघतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कुटुंब म्हणून बघता तेव्हा त्यात अविश्वास दाखवायचा नसतो. पण याच विश्वासाचा काही लोकांनी गैरफायदा घेत आमचा विश्वासघात केला, असं ते म्हणाले.