Big Breaking : मविआ फुटणार? उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी; ठाकरे गटाच्या खासदाराच्या सल्ल्याने खळबळ
देशातील राजकारणाचा चिखल झाला आहे. राजकारणाचे गजकरण झालं आहे. त्याला भाजपच जबाबदार आहे. पूर्वी देशात अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. अजित पवार बंड करतील हे आम्हाला आधीच माहीत होतं...
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आधीच कमकुवत झालेली महाविकास आघाडी आता आणखीनच कमकुवत झाली आहे. परिणामी आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ठाकरे गटाच्या एका बड्या खासदाराने तर उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्लाच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच या खासदाराच्या विधानावरून ठाकरे गटातही सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना हा सल्ला दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. राज्यात शिवसेनेने एकला चलो रेची भूमिका घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेची तशी इच्छा आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा आमचा आग्र होता. पण आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेऊ नये अशी मागणी अजित पवार यांनीच केली होती. आता मात्र, त्यांनीच कोलांटी उडी मारल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला आहे.
शिंदेंनी माफी मागावी
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं, ते एकनाथ शिंदे आता अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून तीन चाकी सरकार चालवणार का? असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप खोटे होते हे सिद्ध झालं आहे. त्यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्या आरोपांबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीत राऊत यांनी केली आहे.
हे घडणार माहीत होतं
आम्ही वरिष्ठांना सांगून निर्णय घेतला असं अजित पवार म्हणत आहेत. याचा अर्थ त्यांचा वरिष्ठ कोण? असा सवाल करतानाच अजित पवार बंड करतील याची कल्पना होती. पण आता या क्षणापासून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होणार म्हणून भाजपचा अजित पवार यांना सोबत घेऊन दुसरा प्लॅन तयार झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.
ते सर्व लटकले
देशात राजकारणाचे गजकरण सुरू झालंय. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपा कसा कृतघ्नपणा करू शकतो हे भाजपने दाखवून दिले आहे. ज्यांना मंत्री पदाची गाजरं दाखवली होती ते सर्व आता लटकले आहेत. लोकशाहीची कशी विटंबना केली जाते हे संपूर्ण जग पाहतंय, असंही ते म्हणाले.