जयंत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव नाकारल्यानेच ईडी चौकशी; दैनिक ‘सामना’तून मोठा गौप्यस्फोट
चौकशीनंतरही शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिलं आहे. पाटला-पाटलांत फरक असतो. काही पाटलांचे पाणी वेगळेच असते. जयंतराव त्यापैकीच एक आहेत, असं दैनिक 'सामना'त म्हटलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडीने नऊ तास चौकशी केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ठरवून विरोधकांचीच चौकशी होत असल्याने या संतापाचा पारा अधिकच चढला आहे. या चौकशीवरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचं बोलावणं आल्याचा मोठा गौप्यस्फोट दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. या अग्रलेखातून भाजपची पिसेच काढण्यात आली आहे.
आयएएल अँड एफएस या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने जयंत पाटील यांची चौकशी केली. ते ही माहिती लेखी स्वरुपातही मागवू शकले असते. पण एखाद्याला त्रास द्यायचा म्हटला की सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. या कथित घोटाळ्यातील लोक भाजपशी संबंधित लोकही असू शकतील. पण त्यांना चौकशीला बोलावलं जात नाही, असा हल्लाबोल दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.
सुखाने झोप लागली असेल
जयंत पाटील यांची नऊ तास चौकशी झाली. ते घरी गेले. त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय लोकांनाही सुखाची झोप लागते. हर्षवर्धन पाटील आणि संजय काका पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनाही सुखाने झोप लागली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडीचं बालंट टळलं, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
प्रस्ताव नाकारला अन् …
जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले. त्यामुळे त्यांना लगेच ईडीचं बोलावणं आलं. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावं असा त्यांच्या वर दबाव होता. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही होती. पण जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने त्यांना ईडीचे बोलावणे आले. ईडीने अनेकांच्या बाबत असेच केले, असा दावाही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
वानखेडे प्रकरणात भाजप बुडाला
या अग्रलेखातून समीर वानखेडे प्रकरणावरून भाजपवर टीका करण्यात आली आहे. तसेच समीर वानखेडे प्रकरणात ज्या भाजप नेत्यांचा हात आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. खार येथील एक टिनपाट भाजप नेत्याच्या घरी वानखेडे आणि त्यांच्या टोळीच्या बैठका चालत होत्या. त्या ठिकाणी देण्याघेण्याचे व्यवहार झाला. वानखेडे प्रकरण साधेसरळ नाही. या प्रकरणात भाजप पूर्णपणे बुडाला आहे, असा दावाही करण्यात आला आहे.