तुमची इयत्ता कंची विचारल्यावर लपवण्यासारखे काय?; दैनिक ‘सामना’तून पंतप्रधान मोदी यांना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. विरोधकांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. तर भाजपची या मुद्द्यावरून चांगलीच कोंडी झाली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल करण्यात आला आहे. मोदींना तुमची इयत्ता कंची असं विचारल्यावर हा बदनामीचा कट आहे असं म्हटलं जातं. मुळात पदवी विचारल्यावर यात लपवण्यासारखे काय आहे? असा सवाल दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे. तसेच मोदींची डिग्रीच रहस्यमय असून एन्टायर पॉलिटिकल सायन्स हा कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी एमए केले आहे. त्यामुळे ते अनपढ आहेत असं कसं म्हणावे? असा खोचक सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पदवीवरून चिमटे काढण्यात आले आहेत. देशात ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यामुळे देशाची बदनामी सुरू आहे. राहुल गांधी यांची खासदारकी एका बनावट खटल्यात रद्द करण्यात आली आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यावर अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. पण देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वत:च्या बदनामीचं पडलं आहे. जे पंतप्रधान स्वत:च स्वत:चं शिक्षण लपवत आहेत, त्यांची बदनामी करण्यासाठी कोण कशाला कष्ट घेईल? असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. जे पेरलं तेच उगवत असतं. एन्टायर पॉलिटिकल सायन्स ही डिग्रीही त्याच पेऱ्यातून उगवली आहे. या सर्वांवर उत्तर देण्याची 56 इंची छाती आहे काय? असा सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
अग्रलेखातील आसूड जशास तसे
- मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात आणि जाहीर मुलाखतीत सांगितलं होतं. नंतर अचानक मोदी यांची ‘एमए’ची पदवी (Entire Political Science) समोर येते आणि अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची ‘डिग्री’ फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी?
- पंतप्रधानांची डिग्री सार्वजनिक करा अशी याचिका अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात करताच न्यायालयाने केजरीवाल यांनाच 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे मोदींची जास्तच बदनामी झाली आणि ती गुजरातच्या न्यायालयाने केली. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण मोदी यांना ”तुमची इयत्ता कंची?” असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे?
- मोदी जी ‘डिग्री’ दाखवत आहेत ती बनावट आहे. गुजरात विद्यापीठाने जी डिग्री मोदींची म्हणून दाखवली त्यावर ‘लिपी शैली’त Master लिहिले आहे, पण ती ‘लिपी शैली’च 1992 साली आली आणि मोदींची डिग्री 1983 सालची आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. आता त्याही पुढे जाऊ. मोदींनी 1979 साली बी. ए. केले. 1983 साली एम. ए. केले. मग 2005 साली त्यांनी का सांगितले की, ”माझे काहीच शिक्षण झाले नाही.” याचे उत्तर मोदींनी द्यायला हवे आणि कोणी त्यांच्या डिग्रीवर आणि शिक्षणावर प्रश्न विचारले की, ”पहा, माझी बदनामी सुरू आहे” असे सांगणे म्हणजे ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळण्यासारखेच आहे.
- मोदींकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे आणि Entire Political Science हा कोणी कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी ‘एम. ए.’ केले. त्यामुळे ते ‘अनपढ’ आहेत असे कसे म्हणावे? फक्त ते त्यांची डिग्री दाखवायला तयार नाहीत. आज देश मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी, कृषी कायदे, नोटाबंदी अशा निर्णयांची किंमत चुकवीत आहे. देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग बरबाद झाला आहे. मोदींचे मित्र ‘अदानी’ यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशासाठी असे घातक निर्णय पंतप्रधान घेतात की कोणी अनपढ, गंवार मंडळी घेतात? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे आणि त्याचा खुलासा पंतप्रधानांची डिग्रीच करू शकते.
- आताही अदानींच्या कंपन्यांत 20 हजार कोटी रुपये कोणाचे? अदानी तुमचे कोण लागतात? आणि पंतप्रधान त्यांना का वाचवत आहेत? देशातील 140 कोटी जनतेला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र या साध्या प्रश्नांवरदेखील ते तोंड उघडायला तयार नाहीत. उलट हे प्रश्न विचारल्याने मोदींची बदनामी होत आहे, अशी बतावणी केली जात आहे. यामागचे गौडबंगाल काय आहे?