Uddhav Thackeray : लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी पैसे नाहीत, पण सरकारे पाडण्यासाठी पैसा आहे, हे कोणतं स्वातंत्र्य?; उद्धव ठाकरेंचा घणाघाती हल्ला
Uddhav Thackeray : डीपीवर तिरंगा टाकायचाच. आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. सोशल मीडिया जोरात आहे. पण जे चाललंय ते सोसंल का? स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजू करण्यासाठी सीमेवर जे उभे आहेत. तिथे लष्करात कपात करणार आहात.
मुंबई: अमेरिका, चीन आणि रशिया सारख्या बलाढ्य देशांनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं मी कधी ऐकलं नाही. पण आपल्या देशात ते सुरू आहे. लष्कर चालवण्यासाठी, लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी तुमच्याकडे पैसा नाही. पण राज्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. हे कोणतं स्वातंत्र्य आहे?, असा संतप्त सवाल शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केला आहे. ज्यांच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतं, ज्यांच्यामुळे घरावर आणि डीपीवर तिरंगा लावू शकतो, त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे. घरात बसून बेंबीच्या देठापासून भारत माता की जय म्हटल्याने शत्रू पळणार नाही. उद्या माझ्या घरावर तिरंगा (tiranga) लावलेला बघून चीन काय पळून जाणार आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्ताने ऑनलाईन संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते. डीपीवर तिरंगा टाकायचाच. आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. सोशल मीडिया जोरात आहे. पण जे चाललंय ते सोसंल का? स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजू करण्यासाठी सीमेवर जे उभे आहेत. तिथे लष्करात कपात करणार आहात. शस्त्र घेण्यासाठी माणसं कमी करणार असाल तर शस्त्र कुणाच्या हातात देणार? चीन, रशिया अमेरिकेने तरी आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं माझ्या वाचनात नाही. लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. पण राज्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे? असा जाब उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना विचारला.
तर अमृत महोत्सव कसला?
देशाची एक मांडणी झाली आहे. संघराज्य आहे. त्यात सर्व राज्य आहेत. ही घटक राज्य एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. ही सर्व राज्य एकत्रं आल्याने त्याला संघराज्य म्हणतात. मग नड्डांना काय म्हणायचं आहे? प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणजे त्यांना संघराज्य संपवायचं आहे का? हे संघराज्य नको हे तुमचं मत देशाच्या नागरिकांचं मत आहे का? त्यावर निवडणुका व्हायला हव्यात. आज तुम्ही गादीवर बसलात म्हणून हम करे सो कायदा चाललं आहे. ही लोकशाही नाही. ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही. अमृत महोत्सव अमृता सारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला?, असा सवालही त्यांनी केला आहे.
मंत्री कुठे आहेत?
यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल आहे. पण सरकार आहे कुठे? काहीही न करता सत्कार करून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचे खाते वाटप नाही. सर्व मंत्री आज आझाद आहेत. कुणावरच काही बंधन नाही. आझादी का अमृत महोत्सव. मंत्र्यांचं चाललंय. पदं मिळाली. पण जबाबदारी नाही. करा, मजा करा. ही अशी मौजमजा मस्ती आहे. त्यावर ब्रशचे फटकारे मोठं काम करतात, असंही ते म्हणाले.