विधान परिषद निवडणुकीत ‘या’ नेत्याची विकेट पडणार?, प्रत्येकाला असं का वाटतंय; आता दावा कुणाचा?
आता सर्वच राजकीय पक्षांकडून 12 पैकी कोण पराभूत होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून 12 पैकी कोण पराभूत होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवढी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळवले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही. पण शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे भाजप आमदारांकडून शेकापचे जयंत पाटील हे पराभूत होणार असे बोललं जात आहे.
सगळ्या पक्षांनी आपआपले आमदार वेगवेगळ्या हॅाटेलमध्ये ठेवले आहेत. उद्या कोणाचा गेम होणार हे उद्या कळेल. जो गेम होईल तो महाविकास आघाडीमध्ये होईल. जे नाराज आहेत ते आमच्यासोबत राहिले असते का? मी स्वत: निगराणी ठेवतो आहे. त्यामुळे उद्या आम्ही सोबत येऊ आणि मतदान करु, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.
“जयंत पाटील यांची विकेट जाणार”
तर आमदार महेंद्र दळवी यांनी “शेकापचे जयंत पाटील यांची विकेट जाणार असल्याचा दावा केला आहे. तसेच आमचा विजय निश्चित होणार आहे. पण त्यांचा मात्र एकच आमदार येईल”, असेही महेंद्र साळवी म्हणाले.
आनंद परांजपे काय म्हणाले?
तसेच आमदार आनंद परांजपे यांनी ही विधानपरिषदेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. “उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील”, असा विश्वास आनंद परांजपेंनी व्यक्त केला आहे.
“राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. पण महविकासआघाडीच्या तीन पैकी एकाचा पराजय निश्चित होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी होऊ शकतात. त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण शेतकरी कामगाराच उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचा हा पराभव शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा पराभव असेल”, असेही आनंद परांजपे यांनी म्हटले.
‘हे’ उमेदवार रिंगणात
भाजपाचे उमेदवार पंकजा मुंडे परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळेकर सदाभाऊ खोत
शिवसेना (एकनाथ शिंदे ) भावना गवळी कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे
काँग्रेस डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद नार्वेकर