निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर पुतळा जाळू! मनसेचा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना इशारा
मनसे विद्यार्थी सेनेनं कुलगुरूंच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मनसे नेते गजानन काळे, अखिल चित्रे ,सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे, यश सरदेसाई यांनी कुलगुरू समोर या सगळ्या निवडणूक कार्यक्रमा संदर्भात जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला
निवृत्ती बाबर प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली होती. सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय विद्यापीठाचा नसून राज्य सरकारचा होता अशी कबुली विद्यापीठाकडून देण्यात आली. निवडणुका स्थगित करण्याचे निर्देश राज्य सरकारचे होते असं म्हणत विद्यापीठाने सरकारची गोची केली होती. या सगळ्या गोंधळानंतर मुंबई सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं. हे संभाव्य वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार पुढच्या वर्षी 21 एप्रिल 2024 रोजी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी सुरु झाली होती. दरम्यान नव्याने सुरू केलेली मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या असा इशारा मनसेकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आलाय.
मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या
नव्याने सुरू केलेल्या मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आलाय. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठ कुलगुरूंना घेराव घातला आणि कुलगुरूंना जोकरचा मास्क लावायचा प्रयत्न केला. कुलगुरूंना मास्क घालण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षाकाकडून कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेनं कुलगुरूंच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मनसे नेते गजानन काळे, अखिल चित्रे ,सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे, यश सरदेसाई यांनी कुलगुरू समोर या सगळ्या निवडणूक कार्यक्रमा संदर्भात जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला.
रस्त्यावर पुतळा जाळला जाईल
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळांनी आक्रमक होत आज कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेतली. “प्रक्रिया जितकी सहज सुलभ होईल ती करायचं सोडून तुम्हाला जितकी शक्य असेल तितकी तुम्ही अवघड करताय. लोकसभा निवडणूक लागल्यावर परत ही निवडणूक पुढे जाणार? काही यांची निवडणूक वगैरे होत नाही फक्त तमाशे चालू आहेत. तुम्ही या खुर्चीत बसून तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. आम्ही आता रस्त्यावर तुमचे पुतळे जाळू. या महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही पहिले असे कुलगुरू असाल ज्यांचा रस्त्यावर पुतळा जाळला जाईल. जर हा निर्णय आत्ताच्या आत्ता नाही झाला तर तुम्ही सांगा तुमचा पुतळा बनवून ठेवलेला आहे” असा थेट इशारा मनसेने विद्यापीठ कुलगुरूंना दिला.