Sanjay Rathod: भाजपची नेमकी खेळी काय? शपथविधी होतो ना होतोच, भाजपच्याच चित्रा वाघांची शिंदेंच्या मंत्र्यावर लढ्याची घोषणा
Sanjay Rathod : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल नंदनवन निवासस्थानी मंत्र्यांची यादी फायनल केली. त्यात प्रत्येकी 9-9 मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत मंत्रीपद कुणाला द्यायचं या नावांवर शिक्कामोर्तबही करण्यात आलं.
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड (sanjay rathod) यांना संधी देण्यात आली आहे. संजय राठोड यांच्यावर टिकटॉक स्टारच्या मृत्यूला ते जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. त्यांनाही शिंदे-भाजपच्या सरकारमध्ये स्थान देण्यात आलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी या मुद्दयावरून रान उठवलं होतं. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना मंत्रिमंडळातून घालवण्यात यावं म्हणून चित्रा वाघ यांनी मुंबई, पुण्यापासून ते यवतमाळपर्यंतचे दौरे केले होते. त्यामुळे राठोड यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. आता त्यांनाच शिंदे-भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, राठोड यांच्याविरोधात आपला लढा सुरूच राहणार असल्याची घोषणा चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यामुळे चित्रा वाघ या पक्षात एकट्या पडल्या की यामागे भाजपची काही खेळी आहे का? असा सवालही यामुळे केला जात आहे.
संजय राठोड हे ठाकरे सरकारमध्ये वन मंत्री होते. आता शिंदे सरकारमध्येही त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजून खाते वाटप केलं नाही. त्यामुळे राठोड यांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या आहेत. राठोड यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याने चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल हे अपेक्षित नव्हते, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे ? @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
भाजपची नेमकी खेळी काय?
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल नंदनवन निवासस्थानी मंत्र्यांची यादी फायनल केली. त्यात प्रत्येकी 9-9 मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत मंत्रीपद कुणाला द्यायचं या नावांवर शिक्कामोर्तबही करण्यात आलं. संजय राठोड यांचं नावही याच बैठकीत फायनल करण्यात आलं. त्याला फडणवीस यांनी कोणताही आक्षेप घेतला नसल्याचं सांगितलं जातं.
ती एक गोष्ट Fadnavis येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला सांगत राहीले, शिंदेंना मान!#MaharashtraCabinet #CabinetExpansion2022 #ShindeFadnavis #EknathShinde #DevendraFadnavis pic.twitter.com/ASKU8cswB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2022
एकीकडे भाजपने राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यास हिरवा कंदील दाखवायचा आणि दुसरीकडे चित्रा वाघ यांनी त्यांच्याविरोधातील लढा सुरू ठेवणार असल्याचं जाहीर करायचं यामागे भाजपची नेमकी खेळी काय आहे? असा सवाल केला जात आहे. केवळ जनतेला संभ्रमात ठेवण्यासाठीची ही खेळी आहे. त्यामागे दुसरं तिसरं काहीच गणित नाही. भटकाविमुक्त समाज भाजपपासून दुरावू नये यासाठी भाजपने राठोड यांच्या नावाला विरोध केला नसावा, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.