Dhairyasheel Mane : ठाकरे कुटुंबाबद्दल कधीच चुकीचं भाष्य करणार नाही; धैर्यशील माने उघड बोलले
Dhairyasheel Mane : लोक भावनेला हात घालत सर्वसामान्य माणसाला माझी भूमिका सांगण्यासाठी मी मतदारसंघात जातोय. कोल्हापूर जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र एकाच विचारांचे हवेत. आम्हा खासदारांना उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं. आम्ही सगळे त्यांना जाऊन भेटलो.
नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची आस्था दाखवणारं शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचं ट्विट व्हारयल झाल्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचं एक महत्त्वाचं विधान आलं आहे. माझ्या हातात आजही उद्धव ठाकरे यांनीच बांधलेलं शिवबंधन आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) असो किंवा आदित्य ठाकरे असो किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात मी कधीही चुकीचं भाष्य करणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. ठाकरे घराण्याचा आम्हाला नेहमीच आदर राहील, असं धैर्यशील माने यांनी स्पष्ट केलं. हे सांगताना धैर्यशील माने यांचे डोळे पाणावले होते. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते. शिरसाट यांच्या ट्विटनंतर आता धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरेंबाबत थेट भाष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आमचं पाऊल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही, आघाडी विरोधात आहे. आजही माझ्या हातातलं शिवबंधन उद्धव ठाकरे यांनी बांधलेलं आहे. माझ्याकडून ठाकरे कुटुंबा बाबत कधीच चुकीचं वाक्य येणार नाही. ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच आमचा प्रयत्न होता. आमचा लढा सर्व सामान्य शिवसैनिकांसाठीच आहे. ठाकरे कुटुंबियांशी माझा जिव्हाळा कायम कायम असेल, असं धैर्यशील माने यांनी सांगितलं.
आम्हाला ठाकरेंना सोडायचं नव्हतं
लोक भावनेला हात घालत सर्वसामान्य माणसाला माझी भूमिका सांगण्यासाठी मी मतदारसंघात जातोय. कोल्हापूर जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र एकाच विचारांचे हवेत. आम्हा खासदारांना उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं. आम्ही सगळे त्यांना जाऊन भेटलो. त्यांना आमच्या समस्या सांगितल्या. राजकीय परिस्थितीही त्यांच्या लक्षात आणून दिली. पण राज्यात जी आघाडी झाली होती ती अनैसर्गिक होती, असंही धैर्यशील माने म्हणाले.
शिरसाट काय म्हणाले?
दरम्यान, शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी काल रात्री एक ट्विट केलं होतं. त्यात उद्धव ठाकरे यांचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख केला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिरसाट हे शिंदे गटात नाराज असल्याची चर्चाही झाली. त्यामुळे शिरसाट यांनी ते ट्विट डिलीट केलं आहे. मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे जुनं ट्विट व्हायरल झाल्याचं शिरसाट म्हणाले. मात्र, आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. तसेच औरंगाबादचं पालकमंत्रीपद हवं आहे. तशी मागणी आपण शिंदे यांच्याकडे केली असून आपली नाराजी व्यक्त केली आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं.