Ajit Pawar: ‘एकनाथ कुठे आहे…?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडलाय, अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
Ajit Pawar : ज्यांनी नेहमी काम करत असताना कसे राजकारण केले पाहिजे हे या राज्याला संस्कार दिले. त्या महाराष्ट्रात तोडा - फोडा - मारा ही भाषा केली जाते हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस, भाजपला पटते का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मुंबई: दिल्ली भेटीतील ‘नीती’ आयोगाच्या बैठकीवेळचा फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे (anand dighe) यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे…?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितच लेचापेचा नाही. परंतु आमचे मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा सन्मान राखू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा अभिमानास्पद इतिहास रचलेल्या महाराष्ट्राला हे दु:ख अधिक बोचणारं आहे. यापुढे तरी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना केलं.
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. उद्यापासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याची घोषणा घाईघाईनं करुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असून त्यात अनेक घटकांचा समावेश नाही. दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पाच वेळा दिल्लीला जाऊन आले. परंतु महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची किंवा राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे त्यांनी केली नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
तोडा – फोडा – मारा ही भाषा पटते का?
शिंदे गटातील एक आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा करत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा… हात तोडा… हात तोडता आले नाही तर तंगडी तोडा… आरे ला कारे म्हणा… कोण अंगावर आलं तर कोथळा काढा अरे ही काय पध्दत आहे का? कुठे शाहू – फुले – आंबेडकरांचा महाराष्ट्र… आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकवला… ज्यांनी नेहमी काम करत असताना कसे राजकारण केले पाहिजे हे या राज्याला संस्कार दिले. त्या महाराष्ट्रात तोडा – फोडा – मारा ही भाषा केली जाते हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस, भाजपला पटते का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आमदारांना इतकी मस्ती आलीय का?
दुसरीकडे शिंदे गटातील एका आमदाराने सरकारच्याच कर्मचाऱ्याला मारले आहे. तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वतः ला कोण समजता… सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला? कुणीही व्यक्ती असली तरी त्यांना संविधान, कायदा, नियम सारखे असतात.कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. तो सरकारमध्ये असुद्या नाहीतर विरोधात यापध्दतीची भाषा… अजून तर कुठं सरकार नीट अस्तित्वात आले नाही तोपर्यंत सरकारमधील आमदारांना इतकी मस्ती आलीय का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.