Raj Thackeray : ‘यूपी’च्या पैलावानामागचा खरा ‘वस्ताद’ कोण? एक सापळा आणि आठ सवाल! राज ठाकरेंचा इशारा नेमका कुणाकडे?
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आरोपांचा चेंडू हवेत भिरकावून दिल्यानंतर आता मनसे नेते त्या हवेतल्या आरोपांमागचा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा दावा करत आहेत. यावेळी पहिल्यांदाच मनसेची भूमिका राज ठाकरेंऐवजी त्यांचे नेते मांडत आहेत.
मुंबई : ”एक साधा खासदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना (Yogi Adityanath) आव्हान देतो, हे शक्य आहे का?” असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2 दिवसांपूर्वी पुण्यातील सभेत केला होता. मात्र, राज यांनी शक्यता व्यक्त केली असली तरी त्यामागचे चेहरे सांगितले नाही. ते चेहरे कोण आहेत, हे मला माहिती असूनही बोलता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आरोपांचा चेंडू हवेत भिरकावून दिल्यानंतर आता मनसे नेते त्या हवेतल्या आरोपांमागचा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) असल्याचा दावा करत आहेत. यावेळी पहिल्यांदाच मनसेची भूमिका राज ठाकरेंऐवजी त्यांचे नेते मांडत आहेत.
मनसे नेत्यांच्या या भूमिकेवर अनेक प्रश्न आहेत.
- जर बृजभूषण सिंहांमागे शरद पवारांचा हात असेल, तर मग योगी सरकार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणार होतं, हा आरोप राज ठाकरेंनी का केला?
- जर बृजभूषण सिंहांना शरद पवारांनी रसद पुरवली असेल, तर मग मी भाजपचंच काम करतोय,असं बृजभूषण सिंह का म्हणाले?
- ज्या उत्तर प्रदेशात योगींनी बड्या-बड्या माफियांना धुळीस मिळवलं, लाखो लोकांच्या विरोधानंतरही अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला, तिथं योगी आदित्यनाथ यांना साध्या एका खासदाराला वेसण का घालता आली नाही?
- महाराष्ट्र, यूपी आणि दिल्लीतल्या भाजप नेत्यांच्या आवाहनाला न जुमानता एका भाजप खासदारानं शरद पवारांचं का ऐकलं?
- पक्षाच्या भूमिकेविरोधात बृजभूषण सिंह थेट दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतात. राज ठाकरेंच्या विरोधासाठी आपल्या मतदारसंघाबाहेर रॅली काढतात, तरीही भाजप त्यांच्यावर कारवाई का करत नाही?
- ज्या भाजपचं उत्तर प्रदेश आणि देशात प्रचंड बहुमत आहे, ज्या भाजपचे देशात 303 खासदार आहेत, त्या पक्षाच्या नेत्याचं 4 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं ऐकण्यामागे काय नफा असेल?
- जेव्हा संजय राऊतांनी कंगना रणौतला मुंबईत पाय ठेवू न देण्याची धमकी दिली होती, तेव्हा केंद्र सरकारनं कंगनाला सिक्युरिटी दिली, ही दडपशाही आहे म्हणत भाजपनं खुली भूमिका घेतली. मात्र जेव्हा बृजभूषण सिंहांनी राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवण्याचा इशार दिला, तेव्हा राज ठाकरेंना अयोध्येत जाण्यासाठी सुरक्षा का दिली गेली नाही?
- जे दोन दिवसांनंतर मनसेचे नेते बोलले, ते दोन दिवसआधी राज ठाकरे का बोलले नाहीत? थेट एक व्यक्ती किंवा एक पक्षावर आरोप करण्याऐवजी राज ठाकरेंनी ‘आपल्याविरोधात सगळे, आपल्याविरोधात सर्व जण,’ असे शब्द का वापरले?
मनसे नेत्यांकडून बृजभूषण सिंह आणि पवारांचे फोटो व्हायरल
दरम्यान, काही मनसे नेत्यांनी शरद पवार आणि बृजभूषण सिंहांचे हे काही फोटो व्हायरल केले आहेत. सध्या बृजभूषण सिंह हे खासदाराबरोबरच अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि शरद पवारांकडे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचं अध्यक्षपद आहे. माहितीनुसार हा फोटो 3 वर्ष जुना आहे. मात्र शरद पवार आणि बृजभूषण यांच्यातले संबंध चांगले आहेत, हे स्वतः बृजभूषण सिंह मान्य करतात. मात्र मनसेचा आरोप त्यांनी फेटाळून लावलाय.
यावर भाजपकडून एकीकडे आमचा खासदार शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करणार नाही, असाही दावा होतोय. दुसरीकडे शरद पवारांनी भाजप खासदाराला रसद पुरवली, या मनसेच्या आरोपांना भाजप योग्य सुद्धा ठरवत आहे.
राज ठाकरे पवारांबाबत बोलले तेच खरं होतंय?
राज ठाकरे हे सडेतोड भूमिकांसाठी ओळखले जातात. मतं मांडताना ते कधीच कुणाचीही भीडमूर्वत बाळगत नाहीत. पण त्यांच्या परवाच्या भाषणातले त्यांचे मुद्दे हे आरोप होते, की अंदाज होते, की मग दावे होते, याचं उत्तर मिळालं नाही. मात्र त्या सभेत जे राज ठाकरे बोलू शकले नाहीत, ते आत्ता त्यांचे नेते बोलत आहेत. घटना कुठचीही घडो, त्याच्याशी शरद पवारांचा संबंध जोडला जातो. असं स्वतः राज ठाकरेच एकदा म्हटले होते. योगायोगानं तीच गोष्ट आज मनसेच्या दाव्यांना लागू पडत आहे.