कोण आहेत ते अधिकारी, ज्यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी रात्रभर धरणं आंदोलन केलं!
कोलकाता (पश्चिम बंगाल) : शारदा चिटफंड घोटाळ्यातील चौकशीसाठी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी सीबीआयने छापा टाकण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या पश्चिम बंगालसह देशभरात एकच गदारोळ माजला. गदारोळ माजण्याचं कारण म्हणजे, राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी घेरलं आणि डांबून ठेवलं. त्यानंतर काही वेळाने सोडूनही दिले. मात्र, कोलकात्याचे […]
कोलकाता (पश्चिम बंगाल) : शारदा चिटफंड घोटाळ्यातील चौकशीसाठी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी सीबीआयने छापा टाकण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या पश्चिम बंगालसह देशभरात एकच गदारोळ माजला. गदारोळ माजण्याचं कारण म्हणजे, राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी घेरलं आणि डांबून ठेवलं. त्यानंतर काही वेळाने सोडूनही दिले. मात्र, कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना वाचवण्यासाठी दस्तुरखुद्द पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मैदानात उतरल्या.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने राजीव कुमार यांच्या घराला भेट दिली आणि त्यानंतर कोलकात्याच्या मेट्रो चॅनलवर धरणं आंदोलन सुरु केलं. अगदी रात्रभर ममता बॅनर्जी यांचं आंदोलन सुरु आहे. ज्यांच्यासाठी ममता बॅनर्जी यांनी रात्रभर धरणे आंदोलन सुरु केले, ते राजीव कुमार कोण आहेत? याची उत्सुकताही सगळ्यांना आहे.
कोण आहेत राजीव कुमार?
सध्या कोलकात्याचे पोलिस आयुक्त असणारे राजीव कुमार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जातात. 2016 साली पुरकायस्थ यांच्या जागी राजीव कुमार यांची कोलकात्याच्या पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली. पुरकायस्थ यांना पदोन्नती देऊन सीआयडी विभागात पाठवण्यात आले. त्याआधी राजीव कुमार हे विधाननगर पोलिस कमिश्नरीमध्ये पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
राजीव कुमार हे पश्चिम बंगाल कॅडरमधील 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे (STF) प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शारदा आणि रोज व्हॅली चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाचे (SIT) नेतृत्त्व राजीव कुमार यांनी केले होते. 2013 साली हा चिटफंड घोटाळा उघडकीस आला होता.
शारदा आणि रोज व्हॅली चिटफंड घोटाळ्यामधील काही महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाल्याप्रकरणी राजीव कुमार आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सहकार्य करावं, असे सीबीआयने सांगितले होते. मात्र, सीबीआयसमोर ते हजर झाले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या घरावर छापा मारण्यात आला होता.
राजीव कुमार प्रामाणिक अधिकारी : ममता बॅनर्जी
“कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार हे जगातील सर्वात प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या सत्याशी एकनिष्ठ, शौर्य आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. ते 24 तास काम करत असतात.”, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीव कुमार यांचं कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या :
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय
ममतांच्या लढ्याला राज ठाकरेंचा पाठिंबा
छापा टाकण्यासाठी गेलेले सीबीआयचे अधिकारी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात