अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल नेमकं काय सांगतो? लटकेंचा विजयच, पण ‘नोटा’ सेकंड लीडला
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नागरिकांनी राजकीय नेत्यांविषयाची उदासीनता आपल्या मतदानातून देखील स्पष्टपणे दाखवून दिलीय, अशी चर्चा आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यांच्या विजयाबाबत फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. पण या पोटनिवडणुकीत एक महत्त्वाची गोष्ट समोर येतेय. भाजपने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवाराचा अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे ऋतुजा यांचा विजयाचा मार्ग आधीच सोपा झाला होता. असं असलं तरी या पोटनिवडणुकीत मतदानासाठी फार कमी नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे ज्या नागरिकांनी मतदान केलं त्यापैकी अनेकांनी नोटाचं बटन दाबून आपली भूमिका दाखवून दिलीय. पोटनिवडणुकीच्या निकालात याबाबतचा खुलासा होतोय.
अंधेरी पोटनिवडणुकीत अतिशय कमी नागरिकांनी मतदान केलं होतं, अशी बातमी तीन दिवसांपूर्वीच समोर आली होती. अनेकांनी मतदानासाठी जाणं टाळलं होतं. हेही असे की थोडके, नागरिकांनी राजकीय नेत्यांविषयाची उदासीनता आपल्या मतदानातून देखील स्पष्टपणे दाखवून दिलीय.
कारण आज जो निकाल समोर येतोय त्यानुसार ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. पण चर्चा सध्या नोटाचीच आहे. नोटा सेकंड लीडला आहे. ऋतुजा यांना जवळपास 60 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलंय. पण जवळपास साडे 12 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाचं बटन दाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे.
निवडणुकीत एकही पक्ष पात्रतेचा नाही किंवा त्या निवडणुकीतील एकाही उमेदवाराला आपली सहमती नसेल तर नागरिकांसाठी नोटा हा पर्याय उपलब्ध असतो. नागरीक नोटाचा पर्याय अवलंबून आपली भूमिका मांडू शकतात. अंधेरी पोटनिवडणुकीत जवळपास साडेबारा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाच्या पर्यायाचं बटन दाबलंय.
विशेष म्हणजे या निवडणुकीत फक्त 31.74 टक्के नागरिकांनी मतदान केलं होतं. त्यापैकी साडेबारा हजार नागरिकांनी नोटाचं बटन दाबून मतदान केल्याने याबाबतची सध्या जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटाकडून भाजपवर आरोप केला जातोय. भाजपने नागरिकांना मतदानात नोटाचं बटन दाबण्याचं आवाहन केलं होतं, असा आरोप केला जातोय. पण भाजपकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलंय.
दुसरीकडे विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच अनेकांनी नोटाचं बटन का दाबलं? याबाबत ऋतुजा यांनी नागरिकांनाच प्रश्न विचारावं अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. याशिवाय नोटाला जे मतदान झालंय ते भाजपसाठी झालेलं मतदान आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, एकंदरीत अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला असला तरी नोटाची चर्चा आहे. त्यामागे गेल्या काही महिन्यांमधील सुरु असलेलं राजकारण कारणीभूत ठरु शकतं, अशी चर्चा आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन जो राजकीय गदारोळ झाला त्यालाच नागरिकांचं हे उत्तर असू शकतं.