सावरकरांवरील ‘त्या’ विधानाचं गुजरात निवडणुकीशी कनेक्शन?; राहुल गांधी यांची काय आहे रणनीती?
गुजरातच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरली आहे. आपने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. गुजरातमध्ये आप आणि भाजपची लढाई होणार असल्याचं चित्रं दाखवलं जात आहे.
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा सुरू असतानाच राहुल गांधी यांनी मध्येच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळत होती. आणि सुटका व्हावी म्हणून सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा दिला होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. तसेच हा दावा करताना राहुल गांधींनी कागदपत्रेही दाखवली होती. सावरकरांनी महात्मा गांधी यांच्यासह समकालीन सहकाऱ्यांनाही धोका दिल्याचंही राहुल म्हणाले. त्यामुळे वादळ निर्माण झालं आहे. तसेच राहुल गांधी यांनी आताच हा मुद्दा उचलण्यामागचं कारण काय आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी हे रणनीतीचा भाग म्हणूनच सावरकरांवर टीका केली. महाराष्ट्रात पत्रकार परिषदेत आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या क्रांतिकारी योगदानाची प्रचंड स्तुती केली.
एकीकडे बिरसा मुंडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच त्यांनी सावरकरांना माफीवीर म्हटलं. असं करून त्यांनी जाणूनबुजून वादाला फोडणी दिली. त्यामुळे पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सावरकरांचं पत्रंच ठेवून भाजपला तोंडघशी पाडलं.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा तापला पाहिजे हे काँग्रेस आणि राहुल गांधींना अपेक्षित होतं. त्यानंतर महात्मा गांधी यांची हत्या त्यानंतर संघावर बंदी आणि सावरकरांना अटक करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांची झालेली मानसिकता आदी गोष्टी चर्चेत याव्यात म्हणून काँग्रेसकडून केलेली ही खेळी असावी असं सूत्रांनी सांगितलं.
त्याशिवाय सावरकरांबाबतच्या काही ऐतिहासिक गोष्टीही काँग्रेसला समोर आणायच्या आहेत. म्हणजे सावरकर नास्तिक होते. ते गायीला पूजा योग्य मानत नव्हते. ते गायीला प्राणी मानायचे. देशाला मातृभूमी नव्हे तर पितृभूमी मानत होते. अशा गोष्टी पुढे आणून सावरकरांची जी हिंदुत्वादी नेते म्हणून प्रतिमा झाली आहे, त्याला तडा देण्याचं काम काँग्रेसला करायचं असल्याचंही सांगितलं जात आहे.
या शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य चळवळीशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्य चळवळ गांधीजींच्या नेतृत्वात लढली. त्यावेळी संघाचे कोणीच त्यांच्यासोबत नव्हते हे मुद्देही समोर आणून संघाची आणि भाजपची देशभक्ती किती बोगस आहे हे दाखवून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं.
गुजरातच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरली आहे. आपने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. गुजरातमध्ये आप आणि भाजपची लढाई होणार असल्याचं चित्रं दाखवलं जात आहे. काँग्रेस कुठेच नाही असंही दाखवलं जात आहे.
अहमद पटेल यांची कमी आणि हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडणं या सर्व गोष्टींचंही काँग्रेसला आव्हान आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठीच राहुल गांधी यांनी ही खेळी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.